Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Pune › शिधापत्रिका आधार लिंक करण्यात तांत्रिक बिघाड

शिधापत्रिका आधार लिंक करण्यात तांत्रिक बिघाड

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 24 2018 10:29PMपुणे : प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून शिधापत्रिकांना आधार क्रमांक संलग्नित (लिंक) करण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.  सध्या एकूण शिधापत्रिकांच्या 15 टक्के शिधापत्रिकांना आधार क्रमांक लिंक करणे शिल्लक आहेे. तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त नाही झाल्यास अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून गैरव्यवहारांवर नियंत्रण मिळविण्याकरिता शिधापत्रिका; तसेच रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुरवठा विभागाची विधानसभानिहाय 11 परिमंडल कार्यालये असून, त्यात 923 रेशन दुकाने आहेत. शिधापत्रिकाधारक लाभार्थी शिधापत्रिकांची संख्या 3 लाख 77 हजार 961 एवढी आहे. यापैकी सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक शिधापत्रिकांना आधार क्रमांक संलग्नित करण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. 23) मुंबई उच्च न्यायालयाने शिधापत्रिकांना आधार संलग्नित बंधनकारक असून, तेे नसेल तर धान्य मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे; त्यामुळे 2015 पासून शिधापत्रिकांना आधार क्रमांकाशी जोडण्यात येत आहे; परंतु अद्यापही संपूर्ण शिधापत्रिका संलग्नित करण्यात आल्या नाहीत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 11 विधानसभानिहाय कार्यालयामध्ये हे काम संथ गतीने सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आधार क्रमांक संलग्नित करण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, पुरवठा विभागाला ते दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळत नाही. 1 एप्रिलपर्यंत आधार लिंक न झाल्यास अनेक कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित राहिल्यास याला कोण जबाबदार असणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 85 टक्के शिधापत्रिकांना आधार क्रमांक लिंक करण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे आधार लिंकचा रिपोर्ट तयार होत नाही; त्यामुळे किती शिधापत्रिका लिंक झाल्या आहेत, हे सांगता येत नाही. तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त केला जाईल. - रघुनाथ पोटे,  शहर अन्नधान्य वितरण अधिकारी (प्रभारी)