होमपेज › Pune › रत्नागिरी, कर्नाटक हापूसचे दर घसरले

रत्नागिरी, कर्नाटक हापूसचे दर घसरले

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:25AMपुणे : प्रतिनिधी

रत्नागिरीसह कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक वाढल्याने घाऊक बाजारात आंब्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रत्नागिरी हापूसचा भाव पेटीमागे 1 हजार रुपये तर कर्नाटक हापूसच्या भावातही सुमारे 30 टक्क्यांनी घट झाली. येत्या काही दिवसांत आवक वाढून भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात लवकर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, आंब्या खाण्याची ही योग्य वेळ असल्याचेही व्यापार्‍यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.  

रविवारी मार्केट यार्डातील फळ विभागात सुमारे 10 हजार पेटी रत्नागिरी हापूसची आवक झाल्याचे सांगून व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असलेला हापूस, आवाक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजारात दाखल झालेल्या 4 ते 8 डझनाच्या कच्च्या आंब्याच्या पेटीला 1 हजार ते अडीच हजार रुपये व तयार आंब्याच्या पेटीला 2 ते साडे तीन हजार रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यामध्ये अनुक्रमे 1 हजार व  500 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले कच्चे आंबे 8 ते 10 दिवसांनी तयार स्वरूपात मिळतील. त्यावेळी तयार आंब्याच्या भावात आणखी घसरण होईल. पुढील काही दिवसात आंब्याची आवक आणखी वाढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

याबाबत बोलताना कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, केवळ पुणेच नाही, तर मुंबईतील बाजारातही कर्नाटक हापूस आंब्याची आवक चांगली होत आहे. तेथील हवामानामुळे यंदा आंब्याचा हंगाम उशीरा सुरू झाला आहे. रविवारी येथील बाजारात कर्नाटक येथून आंब्याच्या चार डझनाच्या तब्बल 30 हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने वाढल्याने सर्व प्रकारच्या आंब्याच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे.

कर्नाटकच्या चार डझनाच्या हापूस आंब्यास 700 ते 1400 रुपये, 4 डझन पायरी आंब्यास 500 ते 800, लालबाग आणि मलिका आंब्याच्या प्रतिकिलोस 30 ते 40 तर बदाम आंब्याच्या किलोला 30 ते 55 रुपये भाव मिळाला. दरम्यान, तयार मालाचे भाव यापेक्षा पाचशे ते हजार रुपयांनी जास्त निघू शकतात. गेल्या वर्षीपेक्षा हे भाव साधारणपणे पाचशे रुपयांनी जास्त निघाले आहेत. तसेच, येत्या रविवारी आंब्याच्या आवकेत आणखी वाढ झाल्यास दरात मोठी घसरण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.