Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Pune › ‘पासपोर्ट’ अर्ज बाद होण्याच्या प्रमाणात झाली तिपटीने वाढ 

‘पासपोर्ट’ अर्ज बाद होण्याच्या प्रमाणात झाली तिपटीने वाढ 

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:20PM

बुकमार्क करा
पुणे : केतन पळसकर

पासपोर्ट काढण्याकरिता क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाकडे नागरिकांना अर्ज दाखल करावा लागतो. 2017 मध्ये हेच अर्ज बाद होण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे; त्यामुळे ‘पासपोर्ट’चा अर्ज दाखल करण्याकरिता 2017 मध्ये पासपोर्ट कार्यालयात नागरिकांचे हेलपाटे वाढले आहेत.

परदेशात भ्रमंतीकरिता, शिक्षणासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कारणासाठी नागरिक प्रवास करीत असतात. त्याकरिता, पासपोर्ट अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पासपोर्ट मिळविण्याकरिता नागरिक पासपोर्ट कार्यालयात अर्ज दाखल करतात. मात्र, कार्यालयाद्वारे त्या अर्जामध्ये विविध त्रुटी काढल्या जातात आणि अर्जदाराने पासपोर्टसाठी दाखल केलेला अर्ज बाद होतो. अशा विविध त्रुटींमुळे 2017 मध्ये अर्ज बाद होण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे.

2016 मध्ये पासपोर्ट काढण्यासाठी 2 लाख 78 हजार 107 नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील, 4 हजार 734 अर्ज बाद झाले आणि 2 लाख 73 हजार 373 नागरिकांना पासपोर्ट मिळाले. मात्र, 2017 मध्ये अर्ज बाद होण्याच्या या प्रमाणात तिपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानुसार, 2017 मध्ये 3 लाख 58 हजार 132 नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील सुमारे 15 हजार 626 अर्ज बाद झाले आणि 3 लाख 42 हजार 506 नागरिकांना पासपोर्ट मिळाले.

अर्जामध्ये असलेल्या विविध त्रुटींमुळे अर्ज बाद होण्याच्या प्रमाणात  वाढ झाली आहे. पासपोर्ट कार्यालयाने अर्ज बाद केल्यानंतर नागरिकांना दंडाची विशिष्ट रक्कम भरून कार्यालयात पुन्हा अर्ज दाखल करावा लागतो. 

पोलिस प्रशासनामार्फत अर्जदाराच्या रहिवासाची एका वर्षाची पडताळणी होते. मात्र, तात्पुरते वास्तव्यास असणारे नागरिक आणि विद्यार्थी मूळ गावचा पत्ता टाकतात. अशा नागरिकांचा अर्ज बाद होतो. त्या बदल्यात, नागरिकांनी एक वर्ष वास्तव्य असणार्‍या ठिकाणचा पत्ता अर्जामध्ये भरावा.    - जयंत वैशंपायन, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी