Tue, Jul 16, 2019 09:46होमपेज › Pune › अपहृत  चिमुकलीचा बलात्कार करून खून 

अपहृत  चिमुकलीचा बलात्कार करून खून 

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 1:20AMलोणी काळभोर ः प्रतिनिधी

तामिळनाडू येथून रोजगाराच्या शोधात आलेले एक कुटुंब झोपेत असताना त्यांच्या एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याची भयावह घटना गुरुवारी (दि. 14) रात्री 12 वाजेच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे घडली. याप्रकरणी लोणी काळभोरच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक पुरावे गोळा करून  मल्हारी हरिभाऊ बनसोडे (वय 21, रा. कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन, पठारेवस्ती, ता. हवेली)  या आरोपीला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी बालिकेची आजी रुकम्मा सुब्रमण्यम (वय 65, रा. लोणी स्टेशन, ता. हवेली. मूळ रा. गुरुराजपालयम, अम्बुर जवळ, जि. वेल्लूर, चेन्नई, तामिळनाडू) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली होती. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुकम्मा सुब्रमण्यम व तिची सून कविता, नातू गणेश, नात पुष्पसती श्रीनिवासन आणि तिच्या दोन मुली पूजा (वय 2), सुहासिनी (वय 1) हे रोजगारासाठी दौंड येथून लोणी स्टेशनला आले होते. दिवसभर काम शोधून रात्री मिळेल त्या ठिकाणी राहत होते. चार दिवसापूर्वी हे सर्व लोणी स्टेशन चौकाजवळील मोकळ्या जागेत राहत होते.  काही नागरिकांनी त्यांना त्याठिकाणी राहण्यास मनाई केल्यामुळे ते सर्व लोणी स्टेशन परिसरात दिवसभर भिक मागून रात्री प्यासा हॉटेलशेजारी जयश्री गारमेंट्स येथे झोपले होते.

रात्री साडेअकराच्या दरम्यान पुष्पसती हिला जाग आली असता तिला मुलगी सुहासिनी जवळ नसल्याचे जाणवले. आजूबाजूला शोध घेतला; परंतु मुलगी न सापडल्याने तिच्या आजीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, पहाटे साडेपाचच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणासमोर बसथांब्याच्या मागील बाजूस सुहासिनीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी सुहास गरुड, निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे सूत्र फिरविले.

त्यानंतर सुहासिनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुण्यातील ससुन रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अहवालात या मुलीवर बलात्कार करून खुन केल्याचे निष्पन्न झाले. यावरुन लोणी काळभोर पोलिस ठाण्यात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवान, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, गणेश पिंगवले, हवालदार नागने, चमन शेख, रुपेश भगत, सागर कडू आदींनी तांत्रिक पुरावे गोळा करून एका संशयिताला ताब्यात घेतले.