Fri, Apr 26, 2019 15:28होमपेज › Pune › मावळातही रानमेवा झाला दुर्मीळ 

मावळातही रानमेवा झाला दुर्मीळ 

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:26PMइंदोरी : ऋषिकेश लोंढे

रानमेवा पाहिला की आपसूकच जिभेला पाणी सुटणारच.! विलायती चिंच, बोरं, करवंदं, तुती, कैरी, आवळा, आबोळी, जाम हा गावाकडचा रानमेवा आता दुर्मीळ होत चालला आहे.
वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेतही पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट गोड, रसाळ रानमेवा... जिभेवर ठेवताच तासन्तास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होतेच होते. विलायती चिंच, आवळा, बोरे, जाम, निंबोळ्या, तिखट मीठ लावलेली तोतापुरी कैरीची चवही काही न्यारीच... उन्हाळा सुरू झाल्याने जिभेचे चोचले पुरविणारा हा रानमेवा गेल्या काही वर्षांत मावळ परिसरात आता दुर्मिळ झाला आहे.

लहान-थोरांना आवडणारा हा रानमेवा आता ठराविक ठिकाणीच बहरताना दिसत आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी मोठ़या प्रमाणात आंबट-गोड बोर, करवंद, आंबोळी, तुती यांची रेलचेल असायची. इंदोरी,नानोली तर्फे चाकण, जांबवडे, भंडारा डोंगर पायथा आदी ठिकाणी रानमेव्यांची झाडांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  बाजारात, चौकात, गल्लोगल्ली व शाळेच्या बाहेर या फळांचे विक्रेते दिसायचे. लहान मुलांच्या या रानमेव्यावर उड्या पडायच्या. अलिकडे गावरान बोरांची जागा नवीन इलायती व पानचट बोरांनी घेतली आहे. जळगाव, अहमदाबादी बोर बाजारात अधिक दिसतात.  गावरान बोराच्या चवीची सर इतर बोरांना नाही.

नानोली येथील श्री फिरंगाई देवी डोंगर पायथ्यावर बोर, करवंद , आंबोळी, तुती फळांचा रानमेवा भेटायचा परंतु, स्थानिक  लोकांकडून  या  झाडांची कत्तल होताना दिसून येत आहेत. सध्या थोड्या फार प्रमाणात डोंगराळ भागात या रानमेवा बोरांचा बहर दिसत आहे. ग्रामीण भागातील मुले बोरांवर ताव मारतात. कातकरी ठाकर समाजातील महिला खूप त्रासातून डोंगराळ भागात जाऊन या बोरांची काढणी करतात. काटे असल्याने काळजी घ्यावी लागते. 

कष्टपूर्वक काढलेल्या या बोरांना बाजारात कमी भाव मिळतो. शहरात मागणी नसली, तरी ग्रामीण भागातील मुलांना या रानमेव्याव्यतिरिक्त कोणत्याच बोरांची चव आवडत नसल्याचे मुलांनी सांगितले. गावात वाढलेली बांधकामे, डोंगराळ भागातील होणारी कामे, कातकरी ठाकर आदी लोकांकडून होणारी झाडांची कत्तल यामुळे आज बोर, करवंद, आंबोळी, तुती यांसारख्या रानमेव्याच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत इंदोरी मावळ येथील वयोवृद्ध ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

 

Tags : pune, pune news, Ranmeva, now rare,