होमपेज › Pune › ‘बाबासाहेबांचे राजकीय तत्त्व रमाईने जपले’ 

‘बाबासाहेबांचे राजकीय तत्त्व रमाईने जपले’ 

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:37AMपिंपरी : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर या महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर जगल्या. बाबासाहेबांच्या पाठीशी रमाबाई उभ्या राहिल्या. कुटुंबातील अडचणींव्यतिरिक्‍त बाबासाहेबांचे राजकीय जीवनमूल्य रमाबाई आंबेडकर यांनी आयुष्यात जपले, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून तथा प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले.
पिंपरी-चिंचवड रमाई महिला मंच व भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रा. अंजली आंबेडकर बोलत होत्या.

या वेळी बार्टीच्या संचालिका प्रज्ञा वाघमारे, भारिप महिला शहराध्यक्षा लता रोकडे, मनीषा साळवे, भीमाताई सुळवे, सरला उपरवट,  अंजली तायडे, वंदना सोनवणे, पंचशीला कुंभारकर, वसंत साळवे, के. डी. वाघमारे आदी उपस्थित होते.

प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत हेवेदावे योग्य नाहीत. जे जे खासगी आहे ते ते राजकीय आहे. महिलांनी आंबेडकरी चळवळीचे राजकारण समजून घ्यायला हवे. स्त्री-पुरुष समानतेच्या पायावर इथली व्यवस्था उभी राहायला हवी. घरातील व्यवस्थाही समतेवर आधारित हवी. स्वातंत्र्य, समता, बंधुता कुटुंबापासून झाली पाहिजे. देशातील राजकीय परिस्थितीवर घराघरात चर्चा व्हायला हवी, तरच भविष्यातील पिढी फुले, शाहू आंबेडकर विचारांची तयार होईल. केंद्राच्या बजेटमध्ये दलित व इतरांची तयारी काय आहे याची चर्चा व्हायला हवी. भीमा कोरेगावमधील दंगल, त्यामागील धार्मिक रंग याबाबत विचार होऊन लोकांचे वैचारिक प्रबोधन व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन या वेळी त्यांनी केले.


बार्टीच्या संचालिका प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या की, महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. उच्चशिक्षित होण्यापासून समाजात वावरायचे कसे, याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्यायला हवा. देवेंद्र तायडे म्हणाले की, राजकारण वाईट नाही. त्यामध्ये असणारे लोक वाईट असतात. सध्या महिलांनी चळवळीचे नेतृत्व करावे. पैशाचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. अशा प्रवृत्तींना गाडायचे काम करायचे आहे. भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अ‍ॅड. मिलिंद कांबळे, गुलाब पान पाटील, सनी गायकवाड आदींनी प्रमुख संयोजन केले.