Wed, Nov 14, 2018 16:44होमपेज › Pune › देहूरोड  येथे ‘ट्राफीक वॉर्डन’ची सुरक्षा रामभरोसे 

देहूरोड  येथे ‘ट्राफीक वॉर्डन’ची सुरक्षा रामभरोसे 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देहूरोड : वार्ताहर

देहूरोड परिसरातुन जाणार्‍या पुणे-मुंबई महामार्गाचे चौपदरीकरण आणि बाजारपेठेजवळ उड्डाणपूल उभारण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामामुळे महार्माावर वाहतुक कोंडी निर्माण होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाने पोलीसांना ट्राफीक वॉर्डन द्यावेत अशी मागणी होती. सहा महिन्यांपुर्वी बोर्डाने दोन्ही मोठ्या चौकात सुमारे आठ ट्राफीक वॉर्डन दिले आहेत. मात्र, हे वॉर्डन आपल्याशी संबंधित नाहीच,असे सांगुन पोलीस अधिकार्‍यांनी चक्क हात वर केले आहेत. या प्रकारामुळे भविष्यात या वॉर्डनसोबत एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी कुणाची? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

देहूरोड येथे सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाममुळे सवाना चौक आणि स्वामी विवेकानंद चौक या प्रमुख वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतुक कोंडीचा प्रश्‍न अतिशय बिकट झाला होता. देहूरोड पोलीस ठाण्यात केवळ चार वाहतुक पोलीस असून यातील एकजण कारवाईमुळे निलंबीत आहे. उर्वरित तिघांपैकी केवळ दोनच कर्मचारी सध्या उपलब्ध आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील वाहतुक नियंत्रणासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ट्राफीक वॉर्डन द्यावेत, अशी पोलीसांची अनेक दिवसांपासून मागणी होती. सहा महिन्यापुर्वी बोर्डाने या दोन्ही चौकांसह शितळानगर चौकातही ट्राफीक वॉर्डन तैनात केले. 
बोर्डाने हे वॉर्डन खासगी संस्थेकडून घेतले आहेत. ते खासगी असल्यामुळे अनेकदा त्यांना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. चौकात वाहतुक नियमन करीत असताना भरधाव वेगात जाणार्‍या दुचाकीस्वारांकडून वॉर्डनच्या श्रीमुकात भडकावून पसार झाल्याचे प्रकारही एकदोन वेळा घडले आहेत. काही वाहनचालक त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करतात, असेही काहीजणांनी सांगितले. जीव धोक्यात घालुन काम करणार्‍या या ट्राफीक वॉर्डनच्या सुरक्षिततेबाबत विचारले असता पोलीसांनी हात वर केले आहेत. आमच्याकडे त्यांनी रिपोर्टींगच केले नाही. ते आमच्या संपर्कातही नाहीत, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण मोरे यांनी पुढारीशी बोलताना दिली. 

दरम्यान, बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांना याबाबत विचारले असता, पोलीसांच्या मागणीवरूनच हे ट्राफीक वॉर्डन देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. पोलीसांना आवश्यक असेल तर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना विनंती करून लवकरच तसे पत्र पोलीसांना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

Tags : Pune Pimpri, Pimpri News, Ram Bharoses, security, trophic warden,  Dehuroad


  •