Fri, Jul 19, 2019 07:51होमपेज › Pune › दहा वर्षांच्या मुलाची हत्या

दहा वर्षांच्या मुलाची हत्या

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 12:42AMराजगुरुनगर : प्रतिनिधी

मेहुण्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या भाच्याचा आत्याच्या नवर्‍यानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार राजगुरुनगर येथे उघडकीस आला. विशेष म्हणजे पोटच्या मुलाच्या खुनाच्या कटात मुलाची आई सहभागी असल्याचा संशय पोलिसांना असून तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. आईच्या पवित्र नात्याला काळिमा फासणार्‍या या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुमित रवींद्र सावंत (वय 10) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. वसंत तुकाराम गोपाळे (वय 42, रा. चिखलगाव, ता. खेड) असे आरोपी आत्याच्या नवर्‍याचे नाव असून, खेड पोलिसांनी त्याच्याविरोधात अपहरण करून खून केल्याचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. त्याचे व सुमित ची आई सविता सावंत हिचे अनैतिक सबंध असल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप जाधव, उपअधीक्षक गजानन टोणपे उपस्थित होते. खेड पोलिसांनी छडा लावलेल्या या खून प्रकरणातील सुमित रवींद्र सावंत (वय 10) याचा मृतदेह रेटवडी( ता. खेड)गावाच्या हद्दीत चासकमानच्या डाव्या कालव्यात तरंगताना आढळून आला. सुमित 15 ऑगस्ट रोजी मित्रासोबत खेळत असताना अचानक गायब झाला होता. दिवसभर शोध घेऊन सुमित सापडला नसल्याने वडील रवींद्र चिंधू सावंत (राजगुरुनगर, मूळ वाळद, ता. खेड) यांनी दि. 16 रोजी पोलिसात तक्रार दिली होती. 

पोलिसांनी तपास सुरू केल्यावर या कुटुंबाकडे नेहमी येणार्‍या नातेवाईकांची चौकशी सुरू केली. त्यात तक्रारदार रवींद्र यांच्या बहिणीचा नवरा वसंत गोपाळे याच्यावर संशय वाढत गेला. शिवाय मुलगा अखेरच्या वेळी खेळत असलेल्या ठिकाणाचे एक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात गोपाळे हा मुलाला दुचाकीवर घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसून येत होते. गोपाळे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने खुनाची कबुली दिली.  

मुलाच्या आईशी अनैतिक सबंध असून त्यात हा मुलगा अडसर ठरत असल्याने संगनमताने त्याचा काटा काढण्याचे ठरले होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. सुमित राहात असलेल्या राजगुरुनगरच्या अहिल्या देवी चौकातून त्याला दुचाकीवर नेऊन शहराच्या उत्तरेला सातकर स्थळच्या (पूर्व) हद्दीत कालव्याच्या पाण्यात टाकून दिल्याचे सांगितले. सुमितला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सुमित हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या केटीएस इंग्रजी विद्यालयात तो इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. त्याला मोठी बहीण आहे.