Mon, Mar 25, 2019 13:35होमपेज › Pune › वन विभागाच्या ‘अर्थकारणा’ने पर्यावरणाचा र्‍हास

वन विभागाच्या ‘अर्थकारणा’ने पर्यावरणाचा र्‍हास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजेगाव :अमोल साळवे

 पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन योग्य राखण्यासाठी 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे; मात्र वृक्षतोड केल्यामुळे वनाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळल्याचे भयानक चित्र राजेगाव वन विभागाच्या क्षेत्रात दिसून येत असून, याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाबीला वन विभागातील ‘अर्थकारण’ कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 

राजेगाव (ता. दौंड) येथे वन विभागाचे विस्तीर्ण क्षेत्र पसरले असून, हा परिसर उजनी जलाशयाच्या सान्निध्यात असल्यामुळे येथे वर्षभर विविध प्रकारची हिरवीगार झाडे पाहायला मिळतात. राजेगाव येथील वनक्षेत्र हे कागदावर रिझर्व्ह फॉरेस्ट या नावाने नोंदीत असून, याची देखभाल दौंड वनपरिक्षेत्र यांच्या अधिकाराखाली आहे. या वनात रानडुक्कर, कोल्हे, ससा, सायाळ, रानबोके, मोर, कोकीळ, पोपट, साप आणि इतर सरपटणारे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असत. मात्र गेल्या काही वर्षापासून वन क्षेत्रात मानवाचा सहवास वाढल्यामुळे हे वन्य प्राणी नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. 

दौंडच्या पूर्व पट्ट्यातील राजेगाव येथील वनक्षेत्र हे मोर आणि जंगली रानडुक्कर या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दिसणारा रंगबेरंगी मोर हा पक्षी येथे पाहायला मिळत नाही. रानडुकरांची शिकार केल्यामुळे हा प्राणीदेखील नामशेष झाला आहे. एकीकडे वन्य प्राण्यांची शिकार केल्यामुळे वन्य प्राणी नामशेष झाले आहेत; तर दुसरीकडे या वन क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट झाली आहे. वनातील लाकूड, सुपीक माती, मुरूम यांची कित्येक वर्षांपासून चोरी केली जात आहे. साधारणतः 15 ते 20 एकर क्षेत्रातील कित्येक हजार ब्रास माती चोरली आहे. त्यामुळे वनात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या संपत्तीची अशी होणारी लूट कोणाच्या परवानगीने झाली अशी दबकी चर्चा राजेगाव परिसरात सुरू आहे. वन विभागाच्या संपत्तीची खुलेेआम होणारी लूट वन विभाग भकास होण्याला कारणीभूत ठरत आहे.