होमपेज › Pune › राजेश बजाजचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला

राजेश बजाजचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला

Published On: Dec 05 2017 1:44AM | Last Updated: Dec 05 2017 1:29AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यायालयात खोटे दावे दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश खैरातीलाल बजाज (55, रा. अंकुर सोसायटी, एरंडवणा) याचा जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मनेर यांनी हा आदेश दिला आहे. त्याचा हा दुसर्‍यांदा जामीन फेटाळण्यात आला आहे.   याबाबत बांधकाम व्यावसायिक आदित्य जयंत दाढे (36, रा. विद्याविलास कॉलनी, औंध) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत 17 जून 2016 रोजी फिर्याद दिली होती. 12 ऑक्टोबर रोजी बजाजला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. 

कोथरूड येथील सर्व्हे नंबर 58/4 येथील 446 चौ. मीटर जमीन फिर्यादी आदित्य दाढे यांनी मूळ मालकाकडून रजिस्टर विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्राने घेतली होती. या जागेवर निवासी प्रकल्प करीत असताना राजेश बजाज ऊर्फ राजेश सचदेवा याने 2001 सालापासून जमिनीचे आपण मालक असून, पुणे पालिका न्यायालयात तसेच शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात जमीनमालकाचे नावाचे बनावट कागदपत्र सादर करून खोटे दावे दाखल केले आहेत.

तसेच बजाज याने आपण वकील असल्याचे खोटे सांगून वकिलीची कामे घेऊन उच्च न्यायालयाने वकिली करण्यास मनाई केली असतानादेखील आदेशाचा भंग केला आहे. दिवाणी दाव्यामध्ये मूळ जमीनमालकाच्या नावाचे 1988 सालचे बनावट हक्कसोड पत्र तयार करून त्यावर बनावट सही करून ते दिवाणी न्यायालयात दाखल करून न्यायालयाची; तसेच दाढे यांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. बजाजने यापूर्वीही मुख्य  न्यायदंडाधिकार्‍यांकडे जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी फेटाळून लावला होता.

दरम्यान त्याने सत्र न्यायालयात जामीन मिळावा यासाठी धाव घेतली होती. परंतु, 1988 च्या बनावट हक्कसोडपत्रासाठी वापरण्यात आलेला स्टँप हा त्या वेळचा नसल्याचे सरकारी पक्षाने निदर्शनास आणून दिले. तो अशा पध्दतीने कागदांमध्ये फेरबदल करू शकतो तर तो साक्षीदारांवरही दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्याचा जामीनअर्ज फेटाळून लावला आहे.