होमपेज › Pune › राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? 

राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? 

Published On: May 12 2018 6:57PM | Last Updated: May 12 2018 6:57PM



पुणे : प्रतिनिधी

राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?..., होय आम्ही टिळकांचे अनुयायी....राजस्थानी सरकारची शाहिरीतून कानउघाडणी..., टिळक दहशतवादाचे जनक तर देशभक्त कोण?...नमन हे लोकमान्यांच्या पाया...अशा शब्दांतून पुण्यातील शाहिरांनी राजस्थान सरकारचा निषेध केला. राजस्थानमधील आठवीच्या पुस्तकात लोकमान्य टिळकांचा उल्लेख दहशतवादाचे जनक असा करण्यात  आला आहे. याचा विरोध करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राजस्थान सरकारची शाहिरीतून कानउघडणी करण्यात आली.

महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष हेमंत मावळे, चेतन हिंगे, प्रा. संगिता मावळे आणि प्रबोधिनीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्फूर्तीदायी पोवाड्यातून लोकमान्य टिळकांचे कार्य शाहिरांनी उपस्थितांना सांगितले. 

हेमंत मावळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचे अग्रणी असलेल्या लोकमान्य टिळकांचा उल्लेख राजस्थानमधील आठवीतील पुस्तकात दहशतवादाचे जनक असा करण्यात आला आहे. याचा विरोध करण्यासाठी आणि लोकमान्य टिळकांचा गौरव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलनात्मक शाहिरीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी उभा केला, त्यांचा असा उल्लेख करणे ही राजस्थान सरकारची घोडचूक आहे, त्यामुळे त्यांनी ताबडतोब ही चूक सुधारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.