Mon, Jul 22, 2019 03:48होमपेज › Pune › बहुप्रतीक्षित मुलाखतीतून शरद पवार यांचा सन्मान

बहुप्रतीक्षित मुलाखतीतून शरद पवार यांचा सन्मान

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

जागतिक मराठी अकादमीतर्फे पार पडलेल्या ‘शोध मराठी मनाचा’  या संमेलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन बुधवार, दि.21 फेब्रुवारी 2018 रोजी करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) येथे ही मुलाखत होणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ही मुलाखत घेणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. 

या वेळी शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘मुक्‍त संवाद... दोन पिढ्यांचा’ या विशेष कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 50 वर्षांचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडणार आहे..  

पार्किंगच्या मर्यादित सुविधेचा विचार करता, कार्यक्रमासाठी येणार्‍या नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. या कार्यक्रमासाठी येणार्‍या नागरिकांनी दुपारी चार (4.00) वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी स्थानापन्न होणे अपेक्षित आहे, असे आवाहन ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक अध्यक्ष, शोध मराठी मनाचा या 15 व्या जागतिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि शोध मराठी मनाचा या संमेलनाचे संयोजक सचिन इटकर यांनी केले आहे.

याच कार्यक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल.  या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे; तसेच लीला गांधी, चंदू बोर्डे, नागराज मंजुळे, विलास रकटे, संदीप वासलेकर, हणमंतराव गायकवाड या आपापल्या क्षेत्रात योगदान देणार्‍या मराठी व्यक्तींचा या वेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. भारती विद्यापीठाच्या स्थापनेला 50 वर्षे झाल्याबद्दल करण्यात येणारा संस्थात्मक सत्कार डॉ. विश्वजित कदम स्वीकारणार आहेत, तर ‘कासव’ या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाल्याबद्दल करण्यात येणारा सत्कार कासव टीमच्या वतीने डॉ. मोहन आगाशे स्वीकारणार आहेत.