पुणे : प्रतिनिधी
अति सुरक्षित आणि पोलिस ठाण्याच्या समोरच असणार्या राजभवनातून चंदनचोरी झाल्याप्रकरणात बंदोबस्तावर असणार्या दोन कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मुख्यालय दोनचे पोलिस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश शुक्रवारी दिले आहेत. सहायक उपनिरीक्षक राजू प्रभाकर गायकवाड आणि पोलिस शिपाई कृष्णा केशव दिसले अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघा कर्मचार्यांची नावे आहेत.
राजू गायकवाड व कृष्णा दिसले हे दोघेही पोलिस मुख्यालयात नेमणुकीस होते. 30 एप्रिलच्या रात्री 9 ते 1 मे च्या सकाळी 9 यावेळेत पोलिस गार्ड म्हणून राजभवन येथे दोघे नेमणुकीस होते. मात्र, त्यानंतरही अज्ञात चोरट्यांनी येथील झाडे चोरून नेली. त्यानंतर वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेतली होती. तसेच, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, बंदोबस्तावर असणार्या दोघांची चौकशी करण्यात आली. त्यात दोघांचा निष्काळजीपणा समोर आला. त्यानंतर या दोघांचे शुक्रवारी निलंबन करण्यात आले आहे. राजभवन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र, दोघेही कर्तव्यावर असताना बेजबाबदार व निष्काळजीपणाचे तसेच शिस्तप्रिय पोलिस दलास अशोभनीय असे वर्तन केल्याचे आदेशात म्हटले आहे. गणेश खिंड रस्त्यावर राज्यपालांचे निवासस्थान म्हणून राजभवन आहे.
अति सुरक्षित परिसर म्हणून ओळखला जातो. त्यातही राजभवनासमोर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला चतु:शृंगी पोलिस ठाणे आहे. गेल्या महिन्यात (दि. 30 एप्रिल) रात्री साडेअकरा ते दुसर्या दिवशी (1 मे) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान राजभवनातील चार चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सुरक्षेसाठी पोलिस असताना चोरट्यांनी ही सुरक्षा भेदून 40 हजार रुपयांची झाडे कट करून तोडून नेली होती. त्यामुळे येथील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
कडक बंदोबस्ताच्या सूचना अन् अति वरिष्ठांच्या भेटी...
राजभवनातील चंदन चोरीची घटना घडल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानंतर पोलिस आयुक्तांकडून येथील सुरक्षाव्यवस्था गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता या ठिकाणी दिवसपाळीला आठ आणि रात्रपाळीला आठ सुरक्षा गार्ड तैनात असणार आहेत. तसेच, चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना राजभवनच्या तीन गेटवर प्रत्येकी एक चेकिंग रजिस्टर तयार करून त्या ठिकाणी ठेवावे.
दिवसपाळी व रात्रपाळीचे बीट मार्शल प्रत्येक तासाला राजभवन येथे भेट देऊन परिसर चेक करतील. पोलिस ठाण्याची मोबाइल पेट्रोलिंग व्हॅनवरील अधिकारी देखील वेळोवेळी राजभवनला भेट देतील. त्या ठिकाणी नेमण्यात आलेले गार्ड व परिसराची तपासणी करतील. पोलिस ठाण्याचे नाईट राऊंडचे अधिकारी राजभवनला दर तासाला भेट देतील. तसेच, नाईट राऊंडचे विभागीय पोलिस अधिकारी परिसर व गार्ड चेक करतील. तसेच, सहायक आयुक्त दोन वेळा आणि पोलिस उपायुक्त हे देखील रात्रीच्या वेळी राजभवनला एक वेळा भेट देतील; तसेच ठिकाणचे गार्ड व सुरक्षाव्यवस्थेची तपासणी करतील, असे आदेश म्हटले आहे.