Fri, Feb 22, 2019 22:36होमपेज › Pune › पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी

पुणे शहर व उपनगरांच्या काही भागात रविवारी सायंकाळनंतर पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक काळ्याभोर ढगांनी दाटी केली. त्याच्या जोडीला विजांचा  कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना भिजतच इच्छीत स्थळी पोहोचावे लागले. तर अनेकांनी आडोशाला उभे राहत पाऊस थांबण्याची वाट पाहिली. 

शहराच्या मध्यवर्ती भागासह फुगेवाडी, औंध, शिवाजीनगर, कोथरूड, डेक्कन परिसर, सेनापती बापट रस्ता, प्रभात रस्ता, भवानी पेठ, पुणे स्टेशन परिसर, सिंहगड रस्ता परिसर, थेऊर, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कात्रज, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, धनकवडी, आदी उपनगराच्या भागात पावसाच्या सरी बरसल्या. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) 3.7 मि.मी पावसाची नोंद झाली. 
दरम्यान, गेले काही दिवस शहर व परिसरातील कमाल व किमान तापमानाच्या पार्‍यात सातत्याने वाढ होत होती. कमाल तापमान 38 ते 40 अंशांच्या दरम्यान नोंदविले जात होते. रविवारच्या पावसामुळे मात्र हवेत सुखद गारवा निर्माण झाला व गेले अनेक दिवस घामाघूम होत असणार्‍या नागरिकांची उकाड्यापासून सुटका केली. 

पावसामुळे वाहतुकीचा वेग रविवारी सायंकाळनंतर काहीसा मंदावला होता. सुटीचा दिवस असल्याने नागरिक सहकुटुंब फिरण्यास घराबाहेर पडले होते. अशांचे पुरते हाल झाले. बच्चेकंपनीने मात्र पावसात भिजत मनमुराद आनंद लुटला. शहरात रविवारी पडलेला पाऊस स्थानिक हवामानात झालेल्या बदलामुळे व बाष्पात झालेल्या वाढीमुळे पडल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले. शहरात रविवारी 39.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. पुढील 2-3 दिवस शहराच्या काही भागात दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.