Thu, May 23, 2019 15:16
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › शहरात दिवसभर पावसाची संततधार

शहरात दिवसभर पावसाची संततधार

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बरसत असणार्‍या पावसाच्या हलक्या सरींनी मंगळवारी मात्र आपला नूर पूर्णपणे बदलला. राज्यात ठिकठिकाणी धो-धो पाऊस पडत असताना शहरात मात्र गेले काही दिवस हलक्या सरींवरच नागरिकांना समाधान मानावे लागत होते. शहर व परिसरात गेले 7-8  दिवस सरासरी 1 मि.मी पाऊस बरसला. मंगळवारी मात्र त्याने मागची सर्व कसर भरून काढत, दिवसभर संततधार कोसळला. शहराच्या सर्वच भागात दमदार पावसाने हजेरी लावली. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पावसाची बॅटिंग अखंडपणे सुरूच होती. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) 6.3 मि.मी पावसाची नोंद झाली.

पावसामुळे सखल भागात पाणी साठून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने नागरिकांना मोठा मनस्तापही सहन करावा लागला. दरम्यान, शहराप्रमाणेच चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. 

जून महिना कोरडाच गेल्यानंतर जुलैमध्ये मोठा पाऊस पडला. मात्र त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मोठ्या पावसाने दडी मारली होती. परंतु मंगळवारच्या पावसाने पुणेकरांना सुखावले असून ओल्याचिंब पावसाळी दिवसाचा अनुभव नागरिकांना घेता आला.  दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. शहराच्या सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. 

पुढील दोन दिवस शहर व परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असून, यादरम्यान एखादी मोठी सर हजेरी लावेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. सध्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली असून, राज्यात चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे बाष्पाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे राज्यासह शहरात मंगळवारी संततधार पाऊस कोसळला. शुक्रवारनंतर मात्र शहरातील पावसाचा जोर कमी होणार असून, त्यानंतर हलका पाऊस पडेल, असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.