Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Pune › पावसाच्या सरी झेलत तुकोबा निघाले पंढरीला!

पावसाच्या सरी झेलत तुकोबा निघाले पंढरीला!

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 1:23AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

उन्हाची तिरीप... सरसर पाऊस... आणि झरझर पावले... मुखी विठुनामाचा गजर... आणि टाळ-मृदंगांची लयबद्ध साथ... अशा वातावरणात देहूतून श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या वाटेवर मार्गस्थ झाला.

पंढरीसी जारे आल्यानो संसारा । 
दीनांचा सोयरा पांडुरंग ॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी ।
 कृपाळू तातडी उतावीळ ॥

या अभंगातील संदेश जोपासत सावळ्या विठुरायाच्या भेटीला श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी मार्गस्थ झाला. आषाढी वारीनिमित्त श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने गुरुवारी देहूतून प्रस्थान ठेवले. परंपरेप्रमाणे इनामदारवाडा या आजोळघरी पालखीचा रात्रीचा मुक्काम होता. शुक्रवारी पहाट उजाडली ती लगबगीतच. पहाटेच्या पहिल्याच प्रहरात वैष्णवांनी इंद्रायणीच्या काठावर पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती. शुभ्र पोषाख, गळ्यात तुळशीच्या माळा, खांद्यावर शुभ्र उपरणे, कपाळावर गोपीचंदन आणि अष्टगंधाचा टिळा लावलेले वारकरी इनामदार वाड्यासमोर पालखीच्या दर्शनासाठी रांगेत येत होते. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस अधीक्षक मोहंमद सुवेझ हक व त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते व प्रांत अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, तहसीलदार गीतांजली शिर्के, संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे, विश्‍वस्त अभिजित मोरे, जालिंदर मोरे, सुनील दिगंबर मोरे यांच्या उपस्थितीत सकाळी नऊच्या सुमारास पादुकांची शासकीय पूजा झाली. या पूजेनंतर भाविकांना पालखीचे दर्शन खुले करण्यात आले. वाड्याच्या बाहेर विशेष पोलिस पथकाचे जवान पालखीचा मार्ग सुरक्षित करताना दिसत होते. सकाळी दहाच्या सुमारास आरती झाल्यावर ‘पुंडलिक वरदा... हरी विठ्ठल’चा जयघोष करीत पालखी इनामदारवाड्यातून बाहेर आणण्यात आली. मानकर्‍यांनी पालखी खांद्यावर घेतली. शिवाजी चौक मार्गाने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आगमन झाल्यानंतर चांदीच्या रथावर पालखी ठेवण्यात आली. टाळ-मृदंगांचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने अवघी देहूनगरी दुमदुमली होती. 

ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच राणी मसुडगे आणि सदस्यांच्या हस्ते सोहळ्यात सहभागी दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास सोहळा वेशीजवळ पोचला. येथे सुवासिनींनी पालखी रथाच्या बैलांचे औक्षण केले. गावाच्या शिवेवर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास सोहळा अनगडशा वली दर्गा येथे पोचला. पालखी रथावरून खांद्यावर घेऊन मेघडंबरीत आणली. परंपरेप्रमाणे पहिली अभंग-आरती येथे झाली. सर्व धार्मिक विधी आटोपून सोहळा एकच्या सुमारास चिंचोलीच्या दिशेने निघाला. दुपारी दीडच्या सुमारास सोहळा चिंचोली पादुका मंदिराजवळ दाखल झाला. येथे अभंग आरती झाल्यानंतर दुपारच्या भोजनासाठी भाविक मंदिरामागील माळरानावर विसावले. दुपारी चारच्या सुमारास पालखीने महामार्गावर प्रवेश केला. येथून तासभराचा प्रवास करत कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिव ओलांडून सोहळ्याने उद्योगनगरीत प्रवेश केला. देहूफाटा येथे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.