Sun, Dec 16, 2018 20:46होमपेज › Pune › येत्या ७२ तासांत मध्य महाराष्ट्रात पाऊस

येत्या ७२ तासांत मध्य महाराष्ट्रात पाऊस

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी 

मध्य महाराष्ट्रात येत्या 72 तासांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नैर्ऋत्येकडून राज्याच्या दिशेने उष्ण वारे वाहत असून स्थानिक वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कमाल व किमान तापमान वाढले आहे. यामुळे पाऊस पडू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील कमाल व किमान तापमानात सोमवारी किंचित वाढ झाली असून ऋतू बदलाचे वेध लागले आहेत, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 

नीचांकी किमान तापमानाची नोंद नाशिक येथे 12.4 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर पुणे 13.8, मुंबई 17.4, रत्नागिरी 19.6, कोल्हापूर 19.1, नाशिक 12.4, सांगली 17.3, सातारा 15.1, सोलापूर 19.1, औरंगाबाद 15.4, नागपूर 14.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकणाच्या काही भागांत किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.