Fri, Jul 19, 2019 22:18होमपेज › Pune › शहरात दुपारनंतर मुसळधार

शहरात दुपारनंतर मुसळधार

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी 
स्थानिक वातावरणात मागील 4-5 दिवसांपासून बदल झाल्यामुळे पुणे शहर व परिसरात गुरुवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरात गेले काही दिवस कमाल तापमानाचा पारा सातत्याने 34 अंशांच्या घरात नोंदविला जात होता. वाढलेली आद्रता, तापलेली जमीन यामुळे शहरात गडगडाटी पाऊस पडल्याचे वेधशाळेने सांगितले. हा पाऊस मान्सूनचाच असून तो सक्रिय नसल्याने तसेच बर्‍याच दिवसांच्या खंडानंतर तो बरसल्याने ढगांचा गडगडाट झाल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले. दरम्यान, सुमारे दोन तास झालेल्या धुव्वाधार पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडवून दिली. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) 54.8 मि.मी पावसाची नोंद झाली. 
 
सकाळपासून कडक ऊन पडले होते. मात्र दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक काळेकुट्ट ढग आकाशात दाटून आले. त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. त्यानंतर काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह टपोर्‍या थेंबांनी पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला मोठा असणारा पाऊस सुमारे पाऊण तासाने संततधार अशा स्वरूपाचा झाला. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान, शहरात मान्सून दाखल झाल्यानंतर आतापर्यंत पाऊस पडला नव्हता. गुरुवारी मात्र शहरात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस पडला. शहराच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. 

मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठून वाहतुकीचा वेग चांगलाच मंदावला. त्यातच देखभाल-दुरुस्तीकरिता गुरुवारी शहराच्या बहुतांश भागातील बत्ती गुल असल्याने सिग्नल देखील बंद होते. यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने दुचाकीस्वार रेनकोट शिवाय घराबाहेर पडले होते. मात्र गुरुवारच्या पावसाने बेसावध दुचाकीस्वारांना चांगलेच भिजवले. शहरात 1 जूनपासून आतापर्यंत 125.3 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील 2-3 दिवस शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 

पानशेत खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस 

धरणाच्या पाणी साठयात वाढ नाही.  खडकवासला  (वार्ताहर)  पुणे शहर व परिसराला पाणी पुरवठा करणारया पानशेत ,वरसगाव व खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज गुरूवारी मुसळधार त्यामुळे पाऊस पडला. टेमघर धरण क्षेत्रात मात्र तुरळक प्रमाणात पाऊस पडला. दुपारी तासाभरात वरसगाव येथे सर्वात अधिक 45 मिलीमीटर इतका पाऊस पडला.आजच्या पावसामुळे धरणातील पाणी साठयात वाढ झाली नसली तरी धरण क्षेत्रात पावसाळी वातावरण असल्यामुळे पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत पाणी साठा होण्यास सुरुवात होईल असे     खडकवासला जलसंपदा विभागातुन सांगण्यात आले. टेमघर व वरसगाव धरणात अद्याप उपयुक्त पाणी साठा  होण्यास सुरुवात झाली नाही.दोन्ही धरणे कोरडी आहेत. पानशेत धरणात 2.67 टिएमसी म्हणजे 25 टक्के तर खडकवासला धरणात 0.27 टिएमसी म्हणजे केवळ 13.95 टक्के इतके पाणी उरले आहे. दोन्ही धरणांत मिळून केवळ 10.9 टक्के इतके पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 21-जून 2017 रोजी धरणसाखळीत जवळपास इतकेच   म्हणजे 2.86 टिएमसी  पाणी होते. 

सोमवार  पासून पाऊस हुलकावणी देत होता.आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खडकवासला _ सिंहगड परिसरासह पानशेत वरसगाव धरणभागात पावसाने हजेरी लावली. तासभर  जोरदार पाऊस पडत होता. पाच नंतर पावसाचा जोर कमी झाला.मात्र जोरदार वारयासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी चार ते पाच वाजे पर्यंत खडकवासला येथे 40 मिलीमीटर पाऊस पडला.  पानशेत येथे 41 मिलीमीटर इतका पाऊस पडला. टेमघर येथे केवळ 4 मिलीमीटर इतका पाऊस पडला. 

चार धरणाच्या खडकवासला धरणसाखळीवर पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील दौंड ,इंदापुर ,हवेली आदी तालुक्यातील शेती व तेथील लाखो रहिवाशी अवलंबून आहेत.पावसाच्या लपंडावामुळे धरणसाखळीत पाणी साठा चिंताजनक स्थिती कडे वाटचाल करत असताना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने तुर्त दिलासा मिळणार आहे.

झाडांच्या फांद्या पडल्याने घरांचे नुकसान 

भवानी पेठ वार्ताहर: जोरदार पाऊस व सुसाट वार्‍याने हरकरानगर वस्तीत घरांवर अचानकपणे झाडांच्या फांद्या पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने सुदैवाने परिसरातील रहिवासी थोडक्यात बचावले. या प्रकरणी अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 474 हरकानगर परिसरात सुमारे सायंकाळी 4:30 वाजता ही घटना घडली. सुमारे 20 वर्षे जुने असलेले पिंपळाचे हे झाड आहे. रहिवाशी कुतबुद्दीन सज्जन, मुनाफ सज्जन व लझाम सज्जन या तिन्ही रहिवाशांच्या घरांवर या झाडांच्या फांद्या  पडल्याने छतांवर पत्र्याचे शेड मोडकळीस येऊन घरांची भिंत ही ढासळली आहे. 

यासंबंधित रहिवाशांनी बोलताना सांगितले की, या झाडाला कीड लागली असून हे झाड कुजलेल्या अवस्थेत आहे. पडलेल्या फांद्या या सुमारे दीड फुटाच्या आहेत. वारंवार उद्यान विभागाला यासंबंधीत तक्रार करून ही दाखल घेतली जात नाही. त्यामुळे झाडांच्या फांद्यांबरोबर आता झाड पडण्याची ही भीती नागरिकांकडून वर्तविली जात आहे. ही घटना उद्यान विभागाच्या दुर्लक्षपणामुळे झाली असून नुकसान भरपाईची ही मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

हडपसर वार्ताहर

गेल्या आठदिवसा पासुन प्रचंड उकाडा व त्यातच दमट हवामानामुळे नागरी ञस्त झाले होते.माञ आज दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सुखद गारवा अनुभवास मिळाला.अनेकांनी या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.हडपसर- मांजरी भागात दमदार पावसाने दुपारीच हजेरी लावल्याने उकाड्यातुन मुक्तता मिळाली आहे,परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी आणि यातुन समुद्रातल्या सारख्या गरम वाफा निघत होत्या.जुन महिनाच्या मध्यावधीत पावसाने ऊशीरा का होईना पण मुसळधार पाऊस पडल्याने आज नागरीकां मधे चैतन्य दिसुन येत होते.आजच्या पाऊसामुळे लोहिया उद्यान , भाजी मंडई, मंञी मार्केट, रविदर्शन हडपसरगांव माळवाडी, डीपीरोड मांजरीच्या रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साचले होते.नागरीकांनी मुसळधार पावसातच काम करीत होते.हा पाऊस किमान चारपाच दिवस पडला तर वातावरण स्वच्छ होण्यास मदत होईल.सध्या बाहेर गारवा पण घरात गरम होत असल्याचे नागरीक सांगतात.पावसाने हजेरी लावल्याने काही भागातील वाहतुक कोंडी झाली.व कांही ठिकाणी  संथ गतीने वाहतुक कोंडीने नागरीक ञस्त झाले  होते.

धायरी - सिंहगड रोड परिसरातील दांडेकर पूल,विठ्ठलवाडी,हिंगणे, वडगाव बु,धायरी  व वडगाव बु ,नर्हे परिसरात पावसाची मेघगर्जनेसह जोरदार हजेरी.धायरी परिसरात वेगवान वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी साडेपाच च्या सुमारास तासभर पावसाने अक्षरशः जोडपून काढले . सर्वच मुख्य रस्त्यावर पाणी साठल्यामुळे व वीजपुरवठा खंडित झाल्याने दुचाकी स्वार व पायी चालणार्‍या नागरिकांची तारांबळ उडाली.सिंहगड रस्ता,वडगाव पुलाखालील चौक,धायरी फाटा येथे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
फोटो ओळ:नर्हे येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातुन मार्ग काढताना नागरिक.

खराडी चंदननगरात दमदार पाऊस 

चंदननगर वार्ताहर 

आठ दहा दिवसाच्या विश्रांती नंतर नगर बायपास, चंदननगर,मुंढवा रोड ,खराडी गावठाण या भागात दमदार पाऊस झाला.काही दिवसापासुन वातावरणात बदल होऊन कडक ऊन तसेच उकाडा जाणवत होता .आज दुपार नंतर ढग दाटून आले व अचानक जोराचा पाऊस सुरु झाला.तब्बल दोन तास पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच रस्ते जलमय झाले होते.पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक ही धिम्या गतीने सुरु होती तर काही ठीकाणी नागरिकांना  ट्राफीक जाम चा सामना करावा लागला.अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल ऊडाली.


खडकी : पावसाची धुवाधार बॅटिंग 

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. धुव्वाधार कोसळणार्‍या पावसाने रस्ते जलमय झाले असून काहीच्या घरात पाणी घुसले आहे. जुन्या होळकर पुलावर पाणी साचल्याने नदीतून मार्ग काढत असल्याचा भास अनेक वाहनचालकांनी अनुभवला.अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रस्ते तसेच वीज खांबांवर झाडे पडल्याने काही मार्गावरील वाहतूक तसेच वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसाच्या जोरदार सरींनी अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसाने सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवीन होळकर पुलाखालील सखल भागामुळे रस्त्यावर चक्क एक फूट पाणी साचले असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत होती. साचलेल्या पाण्यातुन गाडी भरधाव गाडी जाताना  पाण्याचे फवारे उडताना दिसत होते. जोरदार पावसामुळे साप्रस, रेंजहिल्स परिसरात झाडांच्या काही फांद्या पडल्याच्या घटना घडल्या तर सखल भागामध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे बोर्डाचे आरोग्य अधीक्षक बी. एस. नाईक यांनी सांगितले.