Sun, Aug 25, 2019 08:40होमपेज › Pune › पावसामुळे डोंगरदर्‍यात धुक्याची दुलई

पावसामुळे डोंगरदर्‍यात धुक्याची दुलई

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 12:01AMतारळे : एकनाथ माळी

पावसाने दमदार सुरुवात केल्याने  तारळे, सडावाघापूर, जळव व पाटण हा डोंगर दर्‍यात वसलेला भाग धुक्यात हरवून जात आहे. अंगाला झोंबणारा वारा व आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.तारळे विभाग डोंगरदर्‍यांनी व्यापला असल्याने या विभागात अतिवृष्टी होत असते. तसेच अनेक पर्यटन स्थळे असल्याने विशेषतः पावसाळ्यात निसर्ग अनुभवण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची गर्दी होत असते. मुसळधार पाऊस सुरू झाला नसला तरी तारळे -पाटण रस्ता धुक्यात हरवून जात आहे.  जोराच्या पावसात कुटुंबासह फिरण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. अनेक कुटुंब धुके, वारा, हलक्या पावसाच्या सरी अंगावर घेत आनंद लुटत आहेत.

तारळ्यातून पाटणला जाण्यासाठी जळव मार्गे व सडावाघापूर असे दोन मार्ग आहेत. जळव मार्गे जाताना एक घाट चढावा व उतरावा लागतो. या रस्त्यावर अनेक लहान मोठ्या धबधब्यासह धुके अनुभवायला मिळते. मुसळधार पावसाअभावी धबधबे वाहते झाले नाहीत. पण सडावाघापूर रस्त्यावर मात्र अनेक मनमोहक दृश्य अनुभवायला मिळत आहेत.तारळे, सडावाघापूर, पाटण रस्त्यावर एक घाट चढावा लागतो. त्यानंतर भव्य पठार व पवनचक्क्यांच्या मधून जाणारा रस्ता वर्षभर पर्टकांना आकर्षित करतो. सडावाघापूर ते सडा कळकीपर्यंतचे विस्तीर्ण  पठार संपल्यानंतर पुन्हा दुसरा घाट उतरुन जावे लागले. यादरम्यानच्या रस्त्यावर धुक्याचे अच्छादन पसरत असून ते पर्यटकांना खुणावत आहे.

पठारावर  मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा अनुभवायला  मिळतो. रीमझीम पावसाने सुरूवात केली असून संपूर्ण विस्तीर्ण पठारावर धुके पसरत आहे. त्यातून जाणारी वाट, दोन्ही बाजूला पवनचक्क्या, रस्त्यावरून जाणारी जनावरे, गावकरी, शाळेत जाणारी मुले अशी एक ना अनेक मनमोहक दृश्य पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. यादरम्यान निसर्गाची अद्भूत किमया केली असून तीन चार ठिकाणी उलटे धबधबे पर्टकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. हे धबधबे अद्याप वाहते झाले नसले तरी या भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने पावसात चिंब भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. 

फेसाळणार्‍या धबधब्यांची पर्यटकांना प्रतीक्षा ..

फेसाळत उंच डोगरावरून कोसळणार्‍या धबधब्यांचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटक सहकुटुंब दाखल होत आहेत. उलटा धबधबा वहायला लागल्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी पाटण तालुक्यात होते. पर्यटक मनमुराद आनंद लुटत असतात. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने कमालीचा बदल झाला असून पर्यटकांची गर्दी वाढली आहे.