Sun, Jan 20, 2019 06:48होमपेज › Pune › बजेट : 48 तासांनंतरही रेल्वेची 'पिंक बुक' नाहीच

बजेट : 48 तासांनंतरही रेल्वेची 'पिंक बुक' नाहीच

Published On: Feb 03 2018 3:07PM | Last Updated: Feb 03 2018 3:06PMपुणे : प्रतिनिधी 
गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे बजेट सादर केला जात असून, बजेट सादर करून तब्बल 48 तास उलटून गेले असूनही रेल्वेची पिंक बुक अद्यापही तयार करण्यात आलेली नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. यामुळे पुणेकरांना रेल्वे बजेटमधून नेमके काय मिळाले, याबाबत काहीच स्पष्ट झाले नसून रेल्वेच्या पुणे विभागाचे अधिकारी देखील अनभिज्ञच असल्याचे दिसून येते. 
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केवळ पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या लोहमार्गाच्या तरतुदीविषयी घोषणा केली, मात्र ती देखील सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतानाच केली गेल्याचे दिसते. एकंदरीतच पुणेकरांच्या वाट्याला नवे काही आले असण्याची शक्यता धूसर झाली आहे, असे मत रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
पिंक बुकच रेल्वेच्या पुणे विभागाकडे आली नसल्याने पुणेकरांच्या मागण्या अद्यापही गुलदस्त्यातच राहिल्या असून पुणेकरांनी याबाबत तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. पुणे-मुंबई दरम्यान सकाळी दहा वाजता सुटणारी नवी रेल्वे, पुणे-दौंड दरम्यान येणार्‍या स्थानकांचा विकास करणे, पुणे-नाशिक नव्या लोहमार्गाचे काम सुरू करणे, पुणे-लोणावळा लोकलच्या फेर्‍या वाढविणे, पुण्यातून देशाच्या महत्त्वाच्या शहरांत रेल्वे सेवा सुरू करणे, आदी मागण्या पुणेकरांनी केल्या होत्या. मात्र, बजेट सादर करून दोन दिवस उलटून गेले तरीदेखील पुण्याला नक्की काय मिळाले याबाबत काहीच पारदर्शकता दिसत नसून पुणे विभागाचे अधिकारी याबाबत मूग गिळून गप्प बसल्याचे दिसते. रेल्वे मुख्यालयाकडून आम्हाला पुण्याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नसून पिंक बुकही आली नाही, असे रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दै. पुढारीशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर पिंक बुक सोमवारी (५ फेब्रुवारी) आमच्या पर्यंत पोहोचेल, अशी माहितीही त्या अधिकार्‍याने दिल्याने पुणेकरांना सोमवारची प्रतीक्षा करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही, असेच दिसते.