Thu, Jun 20, 2019 02:17होमपेज › Pune › रायगडावर होणार कचरामुक्‍त अभिषेक

रायगडावर होणार कचरामुक्‍त अभिषेक

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

राज्यामध्ये सर्वत्रच प्लास्टिकबंदीचा आदेश लागू झालेला आहे. त्याप्रमाणे रायगडावर साजरा होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार्‍या शिवभक्‍तांनी प्लास्टिक वापर टाळावा. तसेच यावर्षीचा स्वराज्याभिषेक कचरामुक्‍त रायगड या उक्‍तीप्रमाणे हा सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडचे संस्थापक आणि खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

रायगडावर दि. 6 जून रोजी होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसंदर्भात एसएसपीएमएस येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी युवराज शहाजीराजे छत्रपती, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत, शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, विराज तावरे यांसह औरंगाबाद, नाशिक, बीड, उस्मानाबाद आणि पुणे जिल्हा येथून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचारांचा आदर्श समाजाला घालून दिला आहे तो पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्याद‍ृष्टीने रायगड कचरामुक्‍त करण्याच्या उद्दिष्टाने या सोहळ्याच्या निमित्ताने प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 5 जून रोजी सकाळी 7 ते 12 या वेळेत समितीच्या वतीने चित्तदरवाजा येथे रायगड स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात येणार असून होळीचा माळ येथे समारोप करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद विश्रामगृह येथे अन्‍नछत्राचे उद्घाटन, गडपूजन, गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, शाहिरी कार्यक्रम, गडदेवता शिरकाईदेवीचा गोंधळ, जगदीश्‍वराची वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, ही रात्र शाहिरांची हा कार्यक्रम तसेच शिवभक्‍तांशी युवराज संभाजीराजे छत्रपती संवाद साधणार आहेत.

शिवराज्याभिषेकदिनी ध्वजपूजन, शाहिरी कार्यक्रम, शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक, शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करून जगदीश्‍वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधिस्थळाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सांगता करण्यात येणार आहे. यावर्षी हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने आवश्यक त्या सोयी-सुविधा गडावर उभ्या करण्यात येत आहेत. गडावर कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना आढळल्यास त्याच्यावर समितीमार्फत कडक कारवाई करण्यात येणार असून, समितीच्या वतीने स्वयंसेवकांची मोठी फळीही उभारण्यात येणार असल्याचे युवराज संभाजीराजे यांनी सांगितले.