Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून ‘भाजप’त राजीनामानाट्य

अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून ‘भाजप’त राजीनामानाट्य

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 1:27AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आमदार महेश लांडगे गटाचे राहुल जाधव हे तीव्र इच्छुक होते; मात्र महापौरपद लांडगे गटाच्या नितीन काळजे यांच्याकडे असल्याने त्यांना अध्यक्षपद देता येत नसल्याने, आपला अडसर नको म्हणून त्यांनी आपला पदाचा राजीनामा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे सादर केला. तसेच, स्थायी समिती सदस्य राहुल जाधव व शीतल शिंदे, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते आणि शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी यांनीही पदाचे राजीनामे दिले आहेत. 

समाविष्ट गावांतील नगरसेवक राहुल जाधव यांना अध्यक्षपद मिळाले नाही. माझ्या पदाचा अडसर ठरत होता. त्यामुळे मी महापौरपदाचा राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्ष आ. जगताप यांच्याकडे सादर केला आहे, असे महापौर काळजे यांनी पत्रकारांना सांगितले.  महापौर काळजे म्हणाले की, भाजपने पहिला महापौराचा मान मला दिल्याने मी  पक्षाचा ऋणी आहे. मात्र, माझ्या पदाचा जाधव यांना ‘स्थायी’चे अध्यक्षपद मिळण्यासाठी अडसर ठरत असल्याने मी राजीनामा दिला आहे.  तसेच, राहुल जाधव यांनीही स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा सत्तारूढ पक्षनेते पवार यांच्याकडे दिला. क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते आणि शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी यांनीही राजीनामा सादर केला आहे. त्याचबरोबर शीतल शिंदे यांनीही स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा शहराध्यक्षांकडे दिला आहे. समिती अध्यक्षपद स्वत:ला न मिळाल्याने शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी विधी समितीचा राजीनामा दिला होता.
यासंदर्भात सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले की, पालिकेत पक्षाचे तब्बल 88 नगरसेवक आहेत. पदासाठी इच्छुक असणार्‍याची संख्या साहजिकच अधिक आहे. सहा सदस्यांपैकी एकाचे नाव प्रदेश कमिटीने निश्‍चित केले. 
महापौर व इतरांनी राजीनामे माझ्याकडे दिलेले नाहीत, शहराध्यक्षांकडे राजीनामे दिले असतील. नाराजांची समजूत काढली जाईल.लोकशाहीत विरोधकांना महत्त्व आहे. त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला आहे. 
सत्तारूढ पक्षनेत्याच्या राजीनाम्याची चर्चा
राजीनाम्याच्या एक-एक बातम्या धडकत असताना सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही राजीमाना दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली; तसेच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या. यासंदर्भात त्यांना विचारले असता, पवार म्हणाले की, मी गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देईन; तसेच पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे जाहीर करेन. आता मला कोणी राजीनामा मागितलेला नाही आणि मी राजीनामा दिलेला नाही. सोशल मीडियावर केवळ राजीनामा नाट्य पिकविले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.