होमपेज › Pune › मराठा आरक्षणावरून पालिकेत राडा

मराठा आरक्षणावरून पालिकेत राडा

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी 

मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद सलग दुसर्‍या दिवशी महापालिका सभागृहात उमटले. मुख्यसभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणावर बोलण्याची मागणी केली. मात्र, ती मान्य होत नसल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेऊन टेबलवरील फुलदाणी, पाण्याचा ग्लास व अन्य वस्तूंची तोडफोड केली. या गोंधळातच महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले. 

महापालिकेच्या जुलै महिन्याच्या मुख्यसभेच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून फलक फडकवत घोषणाबाजी सुरू केली. महापौर स्थानापन्न होताच घोषणाबाजीने जोर धरला. महापौरांनी नगरसेवकांना आपापल्या जागोवर जाण्याची विनंती केली; मात्र आरक्षणावर बोलू न दिल्यास सभा चालू देणार नाही, असा इशारा सेना गटनेत्यांनी दिला. याच मुद्यावर कालची (बुधवार) सभा तहकूब केली होती, असे म्हणत महापौरांनी सभागृहाचा अवमान करू नये, अशी विनंती केली. मात्र, घोषणाबाजी थांबत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी सभा तहकुबीच्या हालचाली सुरू केल्याचे लक्षात येताच विरोधकांनीही सभा तहकुबी मांडली. 

विरोधकांची तहकुबी थांबवून सत्ताधार्‍यांची तहकुबी नगरसचिवांनी वाचण्यास सुरुवात करताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच शिवसेना नगरसेवकांनी महापौरांच्या डायसवर उडी घेऊन मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच भाजपच्या नगरसेवकांनी मानदंड ताब्यात घेतल्याने चिडलेल्या सेना नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्‍तांच्या टेबलवरील साहित्य ढकलून देत तेथील फुलदाणी, पाण्याचा ग्लास व अन्य वस्तूंची तोडफोड केली. या वेळी सत्ताधारी नगरसेवकांनीही महापौरांच्या आसनाकडे धाव घेऊन त्यांना संरक्षण देत विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच महापौरांनी सभा एक महिन्यासाठी
तहकूब केली.