Thu, Feb 21, 2019 00:55होमपेज › Pune › चाकण घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त

चाकण घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:33AMपिंपरी : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चाकणच्या आंदोलनाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड शहरात होऊ नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात हिंजवडी आयटी पार्क, जुना पुणे-मुंबई महामार्ग, मुंबई बंगळूर महामार्ग, एमआयडीसी असा महत्वाचा परिसर आहे. याठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. या मार्गावरील वाहतुकीला अडथळा झाल्यास पर्यायी रस्त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक चौकामध्ये पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.  

याबाबत परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे म्हणाले की, आंदोलनादरम्यान शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी देखील चर्चा सुरु आहे. शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे आंदोलन बिघडवू पाहणार्‍या कंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात होणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी अधिक कुमक देण्यात आली आहे. आंदोलक व सर्व सामान्य नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील उपायुक्‍त शिंदे यांनी केले आहे.