Wed, May 22, 2019 16:17होमपेज › Pune › आरटीओची ऑनलाईन पेमेंट साईट डाऊन

आरटीओची ऑनलाईन पेमेंट साईट डाऊन

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 12:13AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ)  गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन यंत्रणेला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून आरटीओतील ऑनलाईन पेमेंट भरण्याची यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे शिकाऊ वाहन परवान्यासह विविध सेवांचे पैसे भरणार्‍या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीओ ऑनलाईन झाले तरी एनआयसी संस्थेच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या इंटरनेट यंत्रणेचा बोजवारा उडत असल्याने अर्जदारांचा वेळ वाया जात आहे.

शिकाऊ वाहन परवाना काढणे, कायमस्वरूपी परवान्याची फी भरणे, विविध सेवांची फी भरण्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन यंत्रणेचा वापर केला जात आहे. दरम्यान शनिवारी (दि.16) पासून ऑनलाईन पेमेंट यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांसह कार्यालयातील कर्मचार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजाच्या सलग दोन दिवस ऑनलाईन यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून एनआयसी संस्थेच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या इंटरनेट सेवा खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. दरम्यान ऑनलाईन यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना अपाईंटमेंटची  पुढील तारीख उपलब्ध करून देण्यात आली आहे.