Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › शाळांच्या मुजोरीमुळे आरटीई लॉटरी लांबणीवर

शाळांच्या मुजोरीमुळे आरटीई लॉटरी लांबणीवर

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या दुसर्‍या फेरीस सोमवार, दि.16 रोजी सुरूवात झाली. या फेरीतील प्रवेशासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना बुधवार दि.18 आणि गुरुवार दि. 19 रोजी लॉटरी काढण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयातून देण्यात आले होते. परंतु अद्यापदेखील पुणे जिल्ह्यात लॉटरी जाहीर झालेली दिसून येत नाही. याला केवळ इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी जबाबदार असून शिक्षण विभाग या शाळांच्या मुजोरीपुढे हतबल असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून लॉटरीच्या केवळ तारखा जाहीर करण्यात येत असून प्रत्यक्षात त्या दिवशी लॉटरी जाहीरच होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेशाची काही जिल्ह्यांंमध्ये दुसरी फेरी सुरू झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अद्याप दुसर्‍या फेरीची लॉटरी काढणेच बाकी आहे. एक किलोमीटरच्या आतील विद्यार्थ्यांसाठी पहिली फेरी राबविण्यात आली, आता तीन किलोमीटरच्या आतील विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. त्यांना प्रवेश घेण्यासाठी 10 मे 2018 पर्यंत वेळ दिला जाणार आहे. दरम्यान इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून आरटीई प्रवेश नाकारण्याची मुजोरी अद्याप देखील सुरूच असून या शाळांच्या मुजोरीला पायबंद घालण्यात शिक्षण विभाग पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

आरटीई प्रवेशाचे प्रतीपूर्ती शुल्क मिळत नसल्याच्या कारणावरून ज्या 41 शाळा न्यायालयात गेल्या आहेत. त्यांची सुनावणी औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे. ही सुनावणी दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार शाळांचा समावेश आहे. परंतु या शाळांचा दाखला देत अनेक शाळा प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीतीलच काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नसून दुसर्‍या फेरीच्या रिक्त जागा देखील शाळांनी ऑनलाईन नोंदविल्या नाहीत. त्यामुळे दुसर्‍या फेरीतील प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे.