Wed, Jul 17, 2019 10:22होमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेशापासून वंचित ठेवण्यासाठीच ‘दिरंगाई’

‘आरटीई’ प्रवेशापासून वंचित ठेवण्यासाठीच ‘दिरंगाई’

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:11AMपिंपरी : वर्षा कांबळे 

‘आरटीई’ च्या प्रवेश प्रक्रियेस होणारा विलंब, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, पालकांची पिळवणूक यामुळे दरवर्षी वेळ आणि पैशाचे नुकसान होते. मागील चार - पाच वर्षापासून पिंपरी -चिंचवड शहरात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या योजनेचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम होणे अपेक्षित असताना प्रत्येक फेरीला वेळ वाढविला जातो. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाचे नियोजन नाही. त्यामुळे शासनालाच जाणूबजून प्रवेशास दिरंगाई करायची आहे का ? जेणेकरुन आर्थिक व दुर्बल घटकातील मुलांना या योजनेचा लाभ न मिळता यापासून वंचित रहावी अशी भूमिका यामागे आहे का ? अशी खंत आरटीईचे पालक  व्यक्त करत आहेत.

जानेवारीपासून सुरु असलेली प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंत फक्त दोनच   फेर्‍या झाल्या. . शाळांमध्ये ऑगस्ट महिन्यात परीक्षा सुरु होतात. अशाप्रकारे प्रवेश प्रक्रिया होत असेल तर प्रवेशास काहीच अर्थ नाही. आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविताना शासनाला अडचणी नेमक्या कोणत्या येतात, त्या स्पष्ट कराव्यात, अशी मागणी पालक करत आहेत. प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना आरटीईच्या माध्यमातून पाल्यास इतर मुलांसारखे चांगल्या दर्जाच्या शाळेत शिक्षण देण्याची संधी मिळत आहे. मात्र, प्रत्येक वेळी शाळा प्रशासनाकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने पालकांना वेठीस धरले जात आहे. शाळेत नंबर लागला तर आरटीई विद्यार्थ्याची हेटाळणी तसेच शाळांची अरेरावी, ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली पैसे उकळणे, अशा असंख्य समस्यातून पालकांना जावे लागत आहे. यामध्ये शासनाचे नेमके काय धोरण आहे हे एक मोठे कोडे आहे.  

एकाच पसंतीक्रमामुळे विद्यार्थी प्रवेशाला मुकले 

आरटीईच्या प्रवेश अर्जात यंदा शाळेचा एकच पसंतीक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार तीन किलोमीटर अंतराच्या शाळा निवडूनही चिखली मोशी याठिकाणी राहत असलेल्या विद्यार्थ्यांचा पुण्याच्या जवळ शाळेत नंबर लागला आहे. सध्या एकच पसंतीक्रम असल्यामुळे शाळा आवाक्यात नसेल तर तो प्रवेश घेता येत नाही.  मग तो प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडतो. त्यामुळे विद्यार्थी नंबर लागूनही प्रवेशास मुकत आहेत.