Sun, Aug 25, 2019 12:37होमपेज › Pune › सूचना न देता ‘आरटीई’ प्रवेशास मुदतवाढ 

सूचना न देता ‘आरटीई’ प्रवेशास मुदतवाढ 

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:37AMपिंपरी : वर्षा कांबळे 

आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 7 मार्चपर्यंत दिलेली होती. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे सांगून कोणतीही सूचना न देता 11 मार्चपर्यंत ऑनलाईन मुदतवाढ दिली गेली. मुदतवाढीमुळे ज्या पालकांना मुदतीत अर्ज भरता आले नाही त्यांना अर्ज भरण्याची संधी मिळणार होती. मात्र, शासनाच्या बेफिकीर कारभारामुळे पालक अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान दि. 12 मार्च रोजी प्रवेशाची पहिली लॉटरी जाहीर झाली असून, शासनाच्या बेफिकीर कारभाराचा फटका संबंधित पालकांना बसला आहे. 

आरटीई प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास पालकांना विलंब होत असल्यामुळे 7 मार्च पर्यंत मुदत वाढ करण्यात आली होती. मात्र, बर्‍याचशा पालकांना प्रयत्न करुनही वेळेत दाखला मिळण्यास विलंब लागला. पालकांनी शासनाकडे आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, मुदतवाढ दिल्याने प्रवेश प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाईल यामुळे मुदतवाढ मिळणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले. आणि ज्या पालकांचे अर्ज भरायचे बाकी आहेत त्यांना रिक्त जागांसाठी पुन्हा घेण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्याची संधी दिली जाईल अशी सूचना केली होती. 

यांनतर शासनाने कोणतीही सूचना किंवा परिपत्रक न काढता पुन्हा 11 मार्चपर्यंत लेखी न कळविता ऑनलाईन मुदतवाढ दिली. नेहमी मुदतीवाढीच्या लेखी सूचनेची वाट पाहणारे आरटीई पालक मुदतवाढीच्या सूचनेपासून अनभिज्ञ राहिले. एकीकडे मुदतवाढ मिळणार नाही असे स्पष्ट सांगितल्यानंतर पुन्हा ऑनलाई चार दिवस बोनस मुदतवाढ देऊन आम्हा पालकांची शासनाने फसवणूक केली आहे, असा संताप पालक व्यक्त करत आहेत. 

आरटीईच्या बदललेल्या वेळापत्रकाविषयी कोणत्याही सूचना मिळत नसल्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालकांना मदतीसाठी एकच हेल्पलाईन असल्यामुळे संपर्क होत नाही. प्रवेश प्रक्रियेमध्ये वेळोवेळी केलेल्या बदलांविषयी शासनाकडून कोणत्याच सूचना आल्या नसल्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच आरटीई प्रवेशासाठी मदतकेंद्राची संख्या कमी असल्यामुळे पालकांना वेळेत मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे मदतकेंद्र आणि हेल्पलाईनची संख्या वाढवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. 

मुदतवाढ दिल्याची ऑनलाईन माहिती दिली होती.  8 मार्च रोजी निर्णय घेऊन चार दिवस आणखी मुदतवाढ देण्यात आली. बोनसमध्ये ही मुदतवाढ केली. आणि जर एक महिना मुदतवाढ देऊन पालकांनी मुदतीत अर्ज नाही भरले तर ते चार दिवसात काय भरणार? आम्ही राज्यामध्ये कुठेच मुदतवाढीची सूचना दिलेली नव्हती. - शरद गोसावी, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक विभाग

शासनाने आरटीईबाबत प्रत्येक वेळी जाहिरात करणे आवश्यक आहे. तरच ती माहिती आरटीई पालकांपर्यंत पोहचू शकते. मार्गदर्शन केंद्र आणि हेल्पलाईनचा अभाव असल्यामुळे पालकांना कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही.  - हेमंत मोरे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ