Tue, Jul 23, 2019 06:44होमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेशासाठी  आजपासून सुरूवात

‘आरटीई’ प्रवेशासाठी  आजपासून सुरूवात

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के प्रवेशाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास आज शनिवार दि. 10 रोजी सुरूवात होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या महिनाअखेर  दि.28 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे अर्ज संकेतस्थळावर भरता येणार असल्याची माहिती प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. 

बोगस आरटीई प्रवेशाला आळा बसावा यासाठी आरटीई प्रवेशाचा अर्ज भरताना उत्पन्नाच्या दाखल्याचा ऑनलाइन तसेच ऑफलाइन नंबर देणे बंधनकारक करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास उशीर झाला. तसेच अर्ज भरण्यास नगर जिल्ह्यापासून सुरूवात झाली असून तांत्रिक अडचणींचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच उर्वरित राज्यात आज शनिवार दि.10 पासून अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचे देखील गोसावी यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरताना पालकांनी जास्तीत जास्त दहा शाळा निवडाव्यात, सन 2018-19 या वर्षी इ.1 लीमध्ये प्रवेश घेणार्‍या बालकाचेे दि.30 सप्टेंबर 2018 रोजी किमान वय 5 वर्ष 8 महिने इतके  असेल,ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी, (घरचा पत्ता,जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ.) , लॉटरीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. पालकांनी कोणतेही कागदपत्र अपलोड करू नये. मात्र उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोड क्रमांक ऑनलाइन अर्जात नमुद करावेत, शाळांनी प्रवेश नाकारल्यास पालकांना ऑनलाईन ग्रीव्हीयन्स करता येईल. तसेच ज्या शाळांनी प्रवेश नाकारला आहे. अशा तक्रारींवर निर्णय घेण्याचा अधिकार पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी व मनपा स्तरावर क्षेत्रीय अधिकारी यांना राहतील अशा प्रकारच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. साधारण 28 फेब्रुवारीपर्यंत पालकांना अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी काढता येणार आहे. तशा प्रकारचे वेळापत्रकच जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान आरटीई प्रवेशासाठी गेल्या वर्षी शहरातील 849 शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या तब्बल 15 हजार 693 जागा उपलब्ध झाल्या होत्या. पंरतु यंदा तब्बल 933 शाळांनी नोंदणी केली असल्यामुळे प्रवेशाच्या संख्येत वाढ होऊन  16 हजार 444 जागा उपलब्ध झाल्या आहेत. तर राज्यात तब्बल 8 हजार 985 शाळा उपलब्ध असून प्रवेशासाठी 1 लाख़ 25 हजार 490 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

मोबाईल ऍप व व्हिडिओ नाही...

शासनाच्या परिपत्रकात अधिकार्‍यांना दिलेल्या सूचनांनुसार प्रवेश अर्ज भरण्यासाठी मोबाईल ऍप तयार करावे तसेच प्रवेश अर्ज कसा भरावा यासाठीचा व्हिडिओ तयार करावा व तो ऑनलाईन साईटवर जाहीर करावा. तसेच शिक्षणाधिकार्‍यांनी ग्रामीण तसेच शहरी पातळीवर पत्रकार परिषदा घेऊन प्रवेश प्रक्रियेला व्यापक प्रसिध्दी द्यावी.असे सांगण्यात आले आहे. मात्र यातली कोणतीही सूचना शिक्षण विभागाने सध्या पाळलेली दिसत नाहीत.