Tue, Dec 10, 2019 13:16होमपेज › Pune › चिंचवडमधील आनंद को-ऑपरेटिव्ह बँकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

चिंचवडमधील आनंद को-ऑपरेटिव्ह बँकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

Published On: Jun 26 2019 1:45AM | Last Updated: Jun 26 2019 1:29AM
पुणे : चिंचवड येथील श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी सायंकाळी आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार खातेदारांना एक हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. हे  निर्बंध  सहा महिन्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रोखतेचे प्रमाण न राखल्यामुळे रिझर्व्ह बँकेने मागील दोन वर्षांत आतापर्यंत 2 कोटी 30 लाखांचा दंड बँकेला केला आहे. 
सदर निर्बंध बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी जारी केले आहेत. ‘आरबीआय’च्या सूचनेनुसार श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ सहकार आयुक्तालयाने 15 मार्च रोजी बरखास्त केले आहे.  त्या ठिकाणी सहकार  विभागाचे उपनिबंधक शाहूराज हिरे यांची 16 मार्च रोजी प्रशासक म्हणून नियुक्ती करून त्यांनी तत्काळ पदभार घेतला होता. ‘आरबीआय’ने  निर्बंध जारी केल्यानंतर  याबाबत माहिती देताना हिरे म्हणाले की, श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँकेचे सुमारे 15 हजार खातेदार आहेत.  ‘आरबीआय’च्या निर्बंधानुसार खातेदारांना सध्या एक हजार रुपयांइतकीच रक्कम खात्यातून काढता येणार आहे.

निर्बंधानुसार नव्याने कोणत्याही ठेवी स्वीकारता येणार नाहीत. तसेच नव्याने कोणतेही कर्ज वाटप करता येणार नाही. मात्र, कर्जदारांकडून कर्जाची रक्कम वसूल करता येणार आहे. ठेवीदार - खातेदारांना मेडिकल अथवा अत्यावश्यक कामासाठी रक्कम हवी असल्यास ( हार्डशिप) या बाबतच्या छाननी समितीकडे प्रथम अर्ज करावा लागेल. खातेदाराची निकड ओळखून समिती योग्य त्या शिफारशी करून या बाबतचा प्रस्ताव ‘आरबीआय’कडे मंजुरीसाठी पाठवेल. ‘आरबीआय’च्या मंजुरीनंतर जो मान्य प्रस्ताव होईल , त्यानुसार सदरची मंजूर रक्कम संबंधित खातेदाराला हार्डशिप योजनेअंतर्गत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँकेत  सिंहगड एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कर्मचारी प्रामुख्याने ठेवीदार आहेत. बँकेचे एकूण भागभांडवल 23 कोटी 92 लाख रुपये आहे 25 जून 2019 अखेर बँकेकडे एकूण 17 कोटी 96 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. त्यापैकी बचत खात्यांमध्ये 10 कोटी 13 लाख रुपये आणि मुदत ठेव खात्यामध्ये 7 कोटी 75 लाख रुपये रक्कम आहे. बँकेचे कर्जाचे  येणे बाकी रक्कम 61 कोटी 58 लाख रुपये असल्याची माहितीही हिरे यांनी दिली.