Mon, May 25, 2020 23:58होमपेज › Pune › पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त 

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त 

Last Updated: Oct 10 2019 3:14PM

संग्रहित छायाचित्रपुणे : प्रतिनिधी 

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) आर्थिक अनियमितता, चेक डिस्काउटिंग व अन्य कारणांमुळे निर्बंध लादलेल्या येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर अखेर कारवाई केली. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले. 

‘आरबीआय’च्या आदेशानुसार सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त करुन बँकेवर पुणे शहर जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी गुरुवारी (दि.10) दुपारी प्रशासकपदाचा पदभार घेतला. त्यामुळे बँकेचे माजी अध्यक्ष अनिल भोसले यांना जोरदार चपराक बसली आहे.

‘आरबीआय’ने 26 एप्रिल 2019 रोजी या बँकेची विशेष छाननी केली होती. त्यावेळी बँकेच्या कामकाजात गंभीर चुका, अनियमितता आढळून आल्या होत्या. त्यास अनुसरुन ‘आरबीआय’ने संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याबाबतचे आदेश 7 ऑक्टोबर 2019 रोजी जारी केले. त्यानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 110-अ मधील तरतुदीनुसार, सहकार आयुक्त सोनी यांनी 9 ऑक्टोंबर रोजी आदेश जारी केले.

बँकेवरील संचालक मंडळाची नावे पुढीलप्रमाणे : शहाजी बाबुराव रानवडे (उपाध्यक्ष), संचालक - हनुमान बबनराव सोरटे, विष्णू तुकाराम जगताप, सतीश मारुती कुसमोडे, सुर्याजी पांडुरंग जाधव, नितीन रघुनाथ तुपे, प्रकाश बापुसाहेब जंगम, विजय नामदेव आल्हाट, विश्वास सिताराम गौडूर, हनुमंता करिअप्पा हुस, श्रीकांत भार्गव कुलकर्णी, रमेश दत्तात्रय हांडे (तज्ज्ञ संचालक) आदींचा समावेश आहे.

शिवाजीराव भोसले बँकेवर ‘आरबीआय’ने निर्बंध लादल्यानंतर ठेवीदार, खातेदारांना रक्कम मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या बँकेबाबत सुधीर रामचंद्र आल्हाट; तसेच पुणेकर नागरिक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी ‘आरबीआय’सह सहकार विभागाकडे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्तीची मागणी सातत्याने लावून धरली होती.