Sat, Aug 24, 2019 12:21होमपेज › Pune › रा. चिं. ढेरे यांच्या ग्रंथांचे होणार जतन

रा. चिं. ढेरे यांच्या ग्रंथांचे होणार जतन

Published On: Feb 12 2019 7:31PM | Last Updated: Feb 12 2019 7:31PM
पुणे : प्रतिनिधी

नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून सर्वपरिचित असलेले ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे अर्थात रा. चिं. ढेरे यांच्या स्वत:च्या पुस्तक संग्रहाचे आता जतन होणार आहे. सहकारनगर येथील ढुमे हायस्कूलजवळ ढेरे यांच्या या संग्रहाचे जतन करण्यासाठी एक दुमजली ग्रंथालय साकारण्यात येणार असून येत्या तीन ते चार महिन्यात त्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

याविषयी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, रा. चिं. ढेरे हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक. याबरोबरच त्यांचे साहित्य, इतिहास व प्राच्यविद्या संशोधनातील योगदान हे मोलाचे आहे. हेच योगदान व त्यांनी स्वत: जपलेला पुस्तकरुपी ठेवा जाणकार आणि नव्या पिढीसमोर यावा, त्यांचे कार्य नव्या पिढीला समजावे याबरोबरच त्याचे जतन व्हावे या हेतुने या ग्रंथालयाची उभारणी करून हे ग्रंथालय ढेरे यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात येणार आहे.
सुमारे दोन हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेत या दुमजली ग्रंथालयाचे बांधकाम होणार असून पुढील ३ ते ४ महिन्यात ते पूर्ण होईल. या ग्रंथालयाच्या उभारणीसाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्यात माझ्या आमदार निधीतून देखील निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

या ग्रंथालयात इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाड्‌:मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या स्वत:च्या संग्रहालयातील पुस्तकांबरोबरच रा. चिं. ढेरे यांचे स्वत:चे साहित्यदेखील उपलब्ध असेल. मराठी संस्कृतीचा गेल्या १० शतकांचा इतिहास ढेरे यांच्या ग्रंथात समाविष्ट आहे. देश-विदेशातील अनेक अभ्यासकांनी डॉ. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले होते त्यामुळे त्यांच्या संशोधनाचे संदर्भ जगभरातील संशोधकांना मिळावेत याचा फायदा केवळ पुणे शहरातीलच नाही तर जगभरातील संशोधकांना होईल.