Thu, Jul 18, 2019 14:47होमपेज › Pune ›  पुरंदर विधानसभा चौरंगी होणार हे निश्‍चित

 पुरंदर विधानसभा चौरंगी होणार हे निश्‍चित

Published On: May 23 2018 1:25AM | Last Updated: May 23 2018 1:19AMसासवड : जीवन कड  

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदर - हवेली मतदारसंघामध्ये आताच वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप या निवडणुकीत उतरणार असल्याचे चित्र असून त्यादृष्टीने प्रत्येक पक्ष व इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.युती-आघाडी काहीही झाले तरी चौरंगी लढत होईल असेच वातावरण आहे.कॉग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर या आघाडीत बंडखोरी होणार हे जवळपास नक्की आहे.फक्त राष्ट्रवादीच्या इच्छुकाला बंडखोरी करावयाची वेळ आल्यास तो भाजपाचा झेंडा हाती घेणार का हा उत्सुकतेचा विषय आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री विजय शिवतारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, मनसेचे शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बाबा जाधवराव यांसह भाजपचा एखादा नवीन चेहरा या निवडणुकीत उतरणार असून त्यादृष्टीने प्रत्येक उमेदवाराची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.भाजपा आपल्याच निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देणार की राष्ट्रवादीतील बंडखोराला जवळ करणार हे पहावे लागेल.कारणआघाडीत ही जागा राष्ट्रवादीला गेली तरी संजय जगताप भाजपाची उमेदवारी घेतील असे वाटत नाही. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे.त्यामुळे आघाडीत ही जागा कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर असल्याने आणि कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष इच्छुक असल्याने ही जागा कॉग्रेसला मिळावी असा कॉग्रेसचा आग्रह आहे.परंतु यामध्ये इंदापूरच्या जागेचा अडथळा आहे.त्यामुळे दोन्ही पक्षाचे श्रेष्ठी हा तिढा कसा सोडवणार याकडे लक्ष आहे.पुरंदर-हवेलीची जागा कॉग्रेसला हवी असेल तर विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने इंदापूरच्या जागेवर राष्ट्रवादी हक्क सांगणार असा तिढा आहे.  शिवसेना व भाजप स्वबळावर लढणार हे आजपर्यंत तरी नक्की असल्याने भाजपाचीही तयारी सुरू असल्याचे दिसते. 

मागील निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना 82 हजार 339 तर काँग्रेसच्या संजय जगताप यांना 73 हजार 749 मते मिळाली होती. 8 हजार 590 मतांनी शिवतारे निवडून आले होते. तर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे आघाडीतून ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता जास्त असून यंदाही शिवसेनेचे विजय शिवतारे, काँग्रेसचे संजय जगताप दोघांमध्येच मुख्य लढत होणार आहे. 

राज्यमंत्री विजय शिवतारे हे दोन वेळा निवडून आले आहेत. शिवसेनेकडे पुरंदर पंचायत समितीची सत्ता, जिल्हा परिषदेचे वीर - भिवडी, दिवे - गराडे आणि निरा - कोळविहिरे गटाची सत्ता असून काही ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदूकाका जगताप यांच्या ताब्यात सासवड आणि जेजुरी नगरपालिकांच्या सत्ता, तसेच तालुक्यातील बहुतांशी वि. का. सोसायट्या आणि काही ग्रामपंचायतींची तसेच जिल्हा परिषदेच्या माळशिरस - बेलसर गटाची सत्ता आहे. राष्ट्रवादीकडे काही ग्रामपंचायती असून यावेळी त्यांच्याकडे एकही पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेचा सदस्य नाही. तर भाजपकडे जिल्हा नियोजन मंडळाचे एक पद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे निरा बाजार समितीची सत्ता अशी बलस्थाने आहेत. 

विजय शिवतारे यांनी मागील निवडणूक गुंजवणीचे पाणी या मुद्द्यावर लढविली होती तर आगामी निवडणुकीत गुंजवणी आणि प्रस्तावित आतंरराष्ट्रीय विमानतळ या दोन गोष्टी मुख्य भूमिका बजावणार आहेत. एमआयडीसी प्रकल्प प्रस्तावित आहेत. तर पालखी महामार्ग, सासवड येथील प्रशासकीय कार्यालय ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकल्प कोणत्या पातळीपर्यंत येतात, यावर या निवडणुकीचे बरेचसे गणित अवलंबून राहणार आहे.  

गेल्या तीन वर्षांत जलसंधारणाची झालेली कामे, रस्ते आदीं विविध विकासकामांसह गुंजवणी धरण, प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी आदी मुद्यांवर राज्यमंत्री विजय शिवतारे निवडणुकीत उतरतील. तर मागील निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदूकाका जगताप त्यांच्याकडील दोन नगरपालिका, जिल्हा परिषदेचा गट, सोसायट्या, सामाजिक, संस्थात्मक आणि व्यक्तिगत स्वरूपात केलेल्या विकासकामांवर निवडणुकीत उतरतील.


2014 चा निकाल -
शिवसेना - 82339
काँग्रेस - 73749 
राष्ट्रवादी - 28067 
भाजपा - 18918 
बसपा - 1039 
9 अपक्ष - 6303 
नोटा - 1208