Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Pune › विमानतळाकडे पुरंदर शहरवासीयांच्या घिरट्या

विमानतळाकडे पुरंदर शहरवासीयांच्या घिरट्या

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 1:27AMसासवड : जीवन कड

पुरंदरमधील बहुचर्चित प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या प्रकल्पासाठी सात गावांतील 2832 हेक्टर जमीन अधिग्रहणाबाबत राज्य शासनाने नुकतीच अधिसूचना जारी केल्याने एरवी गावाकडे यात्राकाळात किंवा दिवाळी सणाला येणार्‍या, शहरात नोकरी-व्यवसायासाठी गेलेल्या लोकांचा आता गावाकडे येण्याचा ओढा वाढला असून, पडीक जमिनीवरही आता वारंवार अशा शेतमालकाचे पाय पडू लागले असल्याचे चित्र सध्या विमानतळबाधित गावांसह पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पाहावयास मिळत आहे.  

कारखानदारांच्या जमिनीसाठी घिरट्या

विमानतळाच्या घोषणेमुळे पुरंदरच्या पूर्वभागात अनेक कारखानदार जमिनी पाहण्यासाठी रानोमाळ घिरट्या घालताना दिसत असून, त्यांना जमिनी दाखविण्यासाठी परिसरातील दलाल आणि त्या-त्या गावातील युवक,  तरुण त्यांच्या मागे फुपाट्यातून पळताना दिसत आहेत. तहसील कार्यालयाच्या परिसरात बहीण-भावंडांत जमिनींचे हक्‍कसोड पत्र करून घेताना वादविवाद होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. विमानतळबाधित गावची भाचे कंपनीदेखील मामाच्या गावाकडे घिरट्या घालताना दिसत आहेत. 

पोलिसांकडे तक्रारी वाढल्या

सध्या या भागातील जमिनीचा दर दोन ते तीन पटींनी वाढला आहे.  शेतकरी शेतीच्या रस्त्यासाठी आता काही फूट जागा सोडण्यास तयार नाहीत.  पोलिस स्टेशनमध्ये शेतकर्‍यांचे एकमेकांविरोधात पाणंद रस्ते अडवल्याबाबतच्या तसेच बोगस व्यक्ती उभ्या करून खरेदीखत केल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.विमानतळाच्या घोषणेपासून गेल्या वर्षभरात सासवडच्या भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणीचे शेकडो अर्ज आले असून, अद्यापही हजारो अर्ज या कार्यालयात प्रतीक्षेत आहेत. 

पडीक जमिनीत फलक, फळबागा

अनेक वर्षांच्या पडीक जमिनींना आता कुंपणे घातली जात आहेत. त्यात पाट्या लावून त्यावर जमीनमालकाचे नाव व इतर माहिती लिहिली जात आहे. काही ठिकाणी जुन्या झालेल्या पाट्या पुन्हा रंगवल्याचे दिसते; तर काही ठिकाणी अशा पडीक जमिनींची मशागत करून फळबागा लागवड होताना दिसत आहेत. 

शहरातील मंडळी तलाठ्याकडे...

गावाकडे न राहणारी मंडळी अधूनमधून तलाठी, मंडल; तसेच तहसील कार्यालयात जाऊन जमिनीचे सातबारा,  8-अ,  फेरफार आदी कागदपत्रे काढून घेत आहेत. अशा मंडळींनी आता विमानतळात जमिनी जाणार, अशी मनात खात्री करून आपल्या पाहुणे आणि मित्रमंडळींच्या मदतीने शेजारील तालुक्यात शेतजमिनी पाहून ठेवल्या असल्याची माहिती मिळत आहे.   

पवारांच्या पाठिंब्याने बळ

पुरंदरमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या पहिल्या अंजीर परिषदेत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनीही विमानतळाच्या बाजूने विचार मांडल्याने विमानतळाबाबत चर्चा पुन्हा वाढली आणि यानंतर शहरवासीयांचाही गावाकडे ओघ वाढला.