Thu, Jul 18, 2019 12:49होमपेज › Pune › शेतकर्‍यांकडे ना. शिवतारे यांनी फिरविली पाठ

शेतकर्‍यांकडे ना. शिवतारे यांनी फिरविली पाठ

Published On: Sep 04 2018 1:24AM | Last Updated: Sep 04 2018 1:21AMसासवड : प्रतिनिधी 

पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या दीड वर्षांत अनेक घडामोडी झाल्या. बाधितांनी तहसील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली तरीही शासनाने प्रस्तावित प्रकल्पाच्या जमिनीचा सूक्ष्म सर्व्हे केला व नुकतीच भूसंपादनाबाबत अधिसूचना जारी केली; मात्र या घडामोडींत सुरुवातीला एकदाच मेमाणे-पारगाव येथे शासनाच्या वतीने शेतकर्‍यांच्या बैठकीत गेलेले येथील लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांनी येथील बाधित शेतकर्‍यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे ना. शिवतारे यांनी केवळ 10 मिनिटांमध्ये आपली भूमिका बदलविल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे.

कोणताही प्रकल्प होताना स्थानिक शेतकर्‍यांसह लोकप्रतिनिधींची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असते. ना. शिवतारे यांनी विमानतळाच्या घोषणेनंतर सुरुवातीला एकदाच मेमाणे-पारगाव येथे बाधित सर्व गावांतील शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीत उपस्थित राहून या प्रकल्पामुळे या भागाला किती महत्त्व येणार आहे हे सांगितले; मात्र शेतकरी व प्रामुख्याने महिलांनी या प्रकल्पाला विरोध करीत जमिनी देण्यास तीव्र विरोध दाखवताच ना. शिवतारे यांनी शेतकरी जो निर्णय घेतील त्याबरोबर मी राहणार, असे जाहीर सभेत सांगत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या; मात्र सभेच्या ठिकाणाहून काही अंतरावर गेल्यावर दूरचित्रवाहिनींच्या काही प्रतिनिधींजवळ प्रकल्पाच्या बाजूने मत मांडत काही वेळापूर्वी पारगावमध्ये जाहीर सभेत शेतकर्‍यांना दिलेला शब्द मोडल्याचे संपूर्ण तालुक्याने पाहिले. त्यानंतर मंत्रिमहोदयांनी पुन्हा बाधित शेतकर्‍यांशी गावात येऊन प्रकल्पाबाबत कधीही चर्चा केली नाही; मात्र तालुक्यातील इतर गावांत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात विमानतळामुळे या परिसराचा कसा विकास होईल, पुरंदरच्या शिरपेचात तुरा खोवला जाईल हे सांगताना विमानतळ करणारच, असेही ते ठामपणे सांगताना दिसत आहेत.  

त्यांच्या या भूमिकेबद्दल बाधित शेतकर्‍यांनी अनेकदा मोर्चे, आंदोलने अशा विविध मार्गांनी त्यांचा निषेध केला. खानवडी येथील महात्मा फुले स्मारकात झालेल्या एका कार्यक्रमात तर येथील महिलांनी लोकप्रतिनिधींना याबाबत काही बोलू न देता काळे झेंडे दाखवून निषेध केला तर बाधित गावांतील शेतकर्‍यांनी या प्रकल्पाविरोधात सासवड येथील पालखी महामार्ग रोखून धरत नंतर प्रकल्पाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत लोकप्रतिनिधींच्या बंगल्यासमोर काहीकाळ ठिय्या मांडत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत आपला राग व्यक्त केला होता. त्यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार टाळला गेल्याचेही तालुक्याने पाहिले आहे. मात्र एवढ्या घटना होऊनही लोकप्रतिनिधी मात्र बाधित शेतकर्‍यांशी चर्चा करण्यास कधी गेले नसल्याने बाधितांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर असून त्यांनीही बाधित शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. 

शासन आणि सर्वसामान्य नागरिक यांमधील दुवा म्हणून लोकप्रतिनिधीने काम करायचे असते. मात्र या प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींनी बाधित शेतकर्‍यांकडे दुसरी बैठक घेण्याची तसदी घेतली नाही, त्यांच्या शंकांचे निरसन केले नाही. जर हा प्रकल्प करायचाच असेल तर शासनाच्या बाजूने भूमिका मांडणे गरजेचे होते. बाधितांना पॅकेज, मोबदला, नुकसानभरपाई आदींबाबत माहिती देणे आवश्यक होते. मात्र बाधित शेतकर्‍यांशी चर्चा करण्याऐवजी इतर गावातून प्रकल्पाचे महत्व सांगून त्यांना विमानतळाच्याबाजूने ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन करीत राहिले. वास्तविक हा किंवा कोणताही प्रकल्प करताना ज्यांच्या जमिनींवर प्रकल्प उभा करायचा आहे त्यांना शासन आणि लोकप्रतिनिधीने विश्‍वासात घेऊन चर्चा करणे महत्वाचे असते आणि स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही याचाही शासनाने विचार करणे महत्वाचे आहे. मात्र शासन आणि लोकप्रतिनिधी बाधितांकडेच दुर्लक्ष करतांना दिसत आहे. 

आम्हाला हा प्रकल्प नको तर आमच्या शेतीला पाणी द्या अशी मागणी विमानतळ बाधित शेतकरी करीत आहेत आणि पाण्यासाठीच येथील जनतेने त्यांना दोन वेळा निवडून दिले आहे. खरंतर 2009 च्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण तालुक्याला विजय शिवतारे हे नाव माहित नव्हते, त्यावेळी दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा करून त्यांनी आपली ओळख करून दिली. पुरंदरच्या सर्वसामान्य, स्वाभिमानी शेतकर्‍यांनीही येथील स्थानिक राजकारण व समाजकारणात वर्षानुवर्षे असलेल्या दिग्गजांना डावलून व अनेक राजकीय समीक्षकांना धक्का देत इतिहास घडविला. दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही, या त्यांच्या घोषणेला व पवार विरोधी तीव्र भूमिकेला जनतेनेही उदंड प्रतिसाद दिला आणि विजय शिवतारेंना आमदार करीत पुरंदर विधानसभेवर प्रथमच भगवा फडकावला. पुरंदर किल्ल्यावर टाक्या बांधून त्यात वीर धरणातील पाणी आणून संपूर्ण तालुक्याला ना. शिवतारे देणार होते, नंतर गुंजवणी धरणातील पुरंदरच्या हक्काच्या 2.02 टीएमसी पाण्याची आठवण करून देत पालखी तळावर सात दिवस उपोषण केले, पुण्यातील सिंचन भवनापर्यंत जलदिंडी काढली. गुंजवणी धरणाचे बांधकामही त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले; मात्र प्रत्यक्षात या पाण्याचा लाभ पुरंदरच्या शेतीला कधी मिळणार असा प्रश्‍न पुरंदरच्या शेतकर्‍यांना पडला आहे. आम्हाला हा प्रकल्प नको, आमच्या शेतीसाठी शाश्‍वत पाणी पाहिजे या भूमिकेवर विमानतळ बाधित शेतकरी ठाम आहेत.