Thu, Jun 20, 2019 20:43होमपेज › Pune › पुण्याचा अरुण खेंगले उपान्त्य फेरीत

पुण्याचा अरुण खेंगले उपान्त्य फेरीत

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 22 2017 12:39AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

61 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागातील 70 किलो गटात पुणे जिल्ह्याच्या अरुण खेंगलेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती भुगाव येथे सुरु आहेत. ब गटाच्या 61, 70 आणि 86 किलो गटाच्या लढती रंगल्या. यात माती विभागातील 70 किलो गटात लातूरच्या अलिम शेखने अहमदनगरच्या विकास तोरडमलला नमविले. अलिम शेखची उपांत्य फेरीत अरुणशी लढत होईल. अरुणने दुस-या उपांत्यपूर्व फेरीत धुळ्याच्या ज्ञानेश्‍वर पवारवर विजय मिळवला. यानंतर दुसरी उपांत्य लढत औरंगाबाद शहरच्या अजहर पटेल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राम कांबळे यांच्यात रंगणार आहे. अजहरने नाशिक शहरच्या श्रीराम चहाळेवर मात केली, तर रामने मुंबई शहरच्या चैतन्य पाटीलवर विजय मिळवला.

शुक्रवारपासून महाराष्ट्र केसरीच्या लढती 
या स्पर्धेत गादी विभागात एकूण 39 मल्ल असून, माती विभागात 35 मल्ल आहेत. गादी आणि माती विभागातील विजेता मल्ल महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढतील. जळगावचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी या वेळी या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. त्यामुळे इतर मल्लांना चांगली संधी आहे. असे असले तरी चांदीच्या गदेपर्यंतचा प्रवास सोपा नसेल. कारण यंदाही अव्वल मल्ल या गटात सहभागी झाले आहेत. गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि पुणे जिल्ह्याचा शिवराज राक्षे हे गादी विभागात पहिल्याच फेरीत आमनेसामने येतील. याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचा चंद्रहार पाटील याचेदेखील आव्हान इतर मल्लांसमोर असेल. चंद्रहार तिसर्‍यांदा आपल्या गळ्यात जेतेपदाची माळ परीधान करण्यास उत्सूक आहे. 

अभिजित कटके, शिवराज राक्षे आणि चंद्रहार पाटील सुरुवातीच्या फेर्‍यांमध्येच आमनेसामने येत आहे. त्यामुळे या तिन्ही मल्लांची कसोटी लागणार आहे. चंद्रहार पाटीलची सलामीची लढत गणेश जगतापशी होईल. लातूरचा सागर बिराजदार, बीडचा अक्षय शिंदे, कोल्हापूरचा कौतुक डाफले असे अनेक मल्ल गादी विभागातून आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. सागर बिराजदार आणि विक्रांत जाधव पहिल्याच फेरीत आमनेसामने येतील, तर सचिन येलभरसमोर अक्षय शिंदेचे आव्हान असेल. या दोन्ही लढतीतील विजयी मल्ल दुसर्‍या फेरीत आमनेसामने येतील. तसेच माती गटातून पुणे शहरचा साईनाथ रानवडे, तानाजी झुंजारके, साता-याचा किरण भगत, बुलढाण्याचा बाळा रफीक, जालन्याचा विलास डोईफोडे यांच्यात चुरस असणार आहे. 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, नामदेव मोहिते, माजी खासदार नानासाहेब नवले, स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, संदीप भोंडवे, स्वस्तिक चोंधेयांसह भूगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पैलवानांची वैभवशाली मिरवणूक
हर हर महादेव....छत्रपती शिवाजी महाराज की जय... बोल बजरंग बली की जयचा जयघोष...ढोल ताशांचा गजर...लेझीम, हलगी वादकांचा जोश...गावकजयांचा उत्साह अशा जल्लोषाच्या वातावरणात महाराष्ट्र केसरी मध्ये सहभागी पैलवानांची स्फूर्तीज्योत हातात घेऊन मिरवणूक काढण्यात आली. फुलांचा वर्षाव करुन गावकजयांनी पैलवानांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः गादी विभाग - 61 किलो -चौथी फेरी - आबासाहेब अटकळे वि. वि. उमेश कांबळे, तुकाराम शितोळे वि. वि. सुमीत गुजर, जयेश साळवी वि. वि. नामदेव घोडगे, सौरभ पाटील वि. वि. राजू हिप्परकर. गादी विभाग -86 किलो -चौथी फेरी- प्रसाद रास्ते वि. वि. शिवाजी पवार, हृषीकेश पाटील वि. वि. नीलेश केदारी, संजय सूळ वि. वि. सरदार सावंत, अक्षय कावरे वि. वि. अमोल मुंडे. माती विभाग -86 किलो -चौथी फेरी - दत्ता नरळे वि. वि. वैभव सगरे, नागनाथ माने वि. वि. वासुदेव साळुंके, सुहास गोडगे वि. वि. पवन शिंदे, संतोष पडळकर वि. वि. सागर मोहोळकर.