Mon, Aug 19, 2019 07:37होमपेज › Pune › पुणेकरांना मिळणार २४ तास ‘समान पाणी’

पुणेकरांना मिळणार २४ तास ‘समान पाणी’

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:56AMपुणे : प्रतिनिधी

पुणेकरांना चोवीस तास समान पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेला स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली.  2 हजार 55 कोटींची या योजनेची कामे एलअ‍ॅण्डटी आणि जैन एरिगेशन या कंपन्या करणार आहेत. पहिल्या टप्यात शहरातील पाच भागांमध्ये या योजनेचे काम पूर्ण करून त्यानंतर संपूर्ण शहरात ही योजना राबविली जाणार आहे. पुढील पाच वर्षांत योजनेचे काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती  स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. 

शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील गळतीबरोबरच असमान पाणी पुरवठा रोखण्यासाठी अनेक वर्षांपासून  समान पाणी पुरवठा योजना राबविण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू होते. पालिका निवडणुकीच्या तोंडावर पाण्याच्या टाक्यांच्या उभारणीच्या कामाने या योजनेला प्रत्यक्ष मुहर्त मिळाला. मात्र, या योजनेतील महत्त्वाचा भाग असलेली सतराशे किमीची जलवाहिनी, साडेतीन लाख मीटर केबल डक्ट अशा कामांची निविदा प्रकिया वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. त्यामुळे प्रशासनाला फेरनिविदा मागवाव्या लागल्या होत्या, त्यासाठी तीनवेळा मुदतवाढ द्यावी लागली होती. अखेर या निविदा तब्बल दहा ते बारा टक्के कमी दराने आल्याने या योजनेचा मार्ग सुकर झाला होता.      

त्यानुसार प्रशासनाने या योजनेचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आणला. त्यात एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला सहा निविदांची कामे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर चौथ्या क्रमांकाची निविदा जैन एरिगेशन कंपनीला देण्याच्या उपसुचनेसह प्रस्ताव मान्य करण्यात आला. या निविदा कमी दराने आल्याने 2 हजार 315 कोटींचा हा प्रकल्प असून  2055 कोटींमध्ये पूर्ण होणार आहे. तसेच यापूर्वीच्या वाढीव दराच्या निविदा रद्द करून फेरनिविदा तसेच फेर ईस्टीमेटमुळे महापालिकेचे तब्बल अकराशे कोटी रुपये वाचले असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.  पुढील पाच वर्षात ही योजना पूर्ण होणार असून त्यामुळे पाण्याची गळती रोखून शहराच्या प्रत्येक भागाला समान पाणी मिळू शकणार आहे.

आधी पाच भागात नंतर संपूर्ण शहरात

समान पाणी पुरवठा योजना राबविण्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर शहराच्या पाच वेगवेगळ्या भागात ही योजना राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याच्या निविदा प्रकियेला प्रतिसाद मिळू न शकल्याने हा प्रायोगिक प्रकल्प गुंडाळावा लागला होता. मात्र, आता या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर पूर्वनियोजनाप्रमाणे शहराच्या पाच भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यात सहकारनगर, राजस सोसायटी कात्रज, भवानी पेठ, विमाननगर आणि नागपूर चाळ अशा भागांचा समावेश आहे. याठिकाणी योजना प्रत्यक्षात आल्यानंतर संपूर्ण शहरात ती राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी दिली. येत्या 15 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्जाचा बोजा होणार कमी

योजनेचा खर्च कमी झाल्यामुळे महापालिकेवरील खर्चाचा बोजाही कमी होणार आहे, या योजनेसाठी महापालिकेने अमृत योजनेतून 200 कोटी, स्मार्ट सिटीतून 300 कोटी,  महापालिका स्वत: 550 कोटी आणि उर्वरित 2 हजार 200 कोटी कर्जरोख्यांतून उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र, या योजनेचा खर्च कमी झाल्याने आता सतराशे ते अठराशे कोटींचेच कर्जरोखे काढावे लागतील असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे पाचशे कोटींनी कर्जाचा बोजा कमी झाला आहे.