Thu, Jun 20, 2019 14:44होमपेज › Pune › विहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू

विहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू

Published On: Jan 01 2018 2:03AM | Last Updated: Dec 31 2017 11:10PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

खेळताना पडीक विहिरीत पडल्याने अक्षरा प्रकाश शेगर (6 वर्षे, रा. हडपसर) या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी गळाच्या साह्याने तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.  मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरा शेगर हिची आई नोबेल हॉस्पिटलशेजारी  हॉटेलमध्ये काम करते. ती हडपसर परिसरात राहण्यास आहे. मगरपट्टा रोडवरील  कॅनॉल रोडजवळ  पडीक विहीर आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अक्षरा हिची आई आणि ती दोघी तेथे आल्या होत्या. त्या वेळी अक्षराची आई काही कारणास्तव हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत अक्षरासह आली होती.

तिचे लक्ष विचलित झाले. या वेळी अक्षरा तेथेच मोकळ्या जागेत खेळत होती. शेजारील चाळीस फूट खोल असलेली विहीर आणि आजूबाजूला असलेले गवत यांचा तिला अंदाज आला नाही. ती विहिरीत पाय घसरून पडली. त्यानंतर तिच्या आईने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेजारील वस्तीतील नागरिकांनी तेथे गर्दी केली. त्यांनी तेथे पाहणी केली; मात्र अक्षरा दिसत नव्हती. काही वेळाने तिची चप्पल वर आली. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. हडपसर अग्निशमन केंद्राचे प्रमुख शिवाजी चव्हाण, फायरमन संपत चवरे, अमित शिंदे, बाबा चव्हाण, नरसप्पा भंडारी, मारुती शेलार, सखाराम पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गळाच्या साह्याने अक्षराचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.