Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Pune › 'दंगलीचे सूत्रधार शोधून कडक कारवाई करा'

'दंगलीचे सूत्रधार शोधून कडक कारवाई करा'

Published On: Jan 03 2018 6:31PM | Last Updated: Jan 03 2018 6:31PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

वढू बुद्रुक आणि कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगलीचा निषेध करीत असून, या दंगलीचे मुख्य सुत्रधार शोधून त्यांच्यावर शासनाने त्वरीत कारवाई करावी. तसेच या दंगलीत मृत पावलेल्या दोन तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर सकल मराठा समाजाच्या समनव्यकांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, धनंजय जाधव यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सकल मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील समन्वयक वढु गावामधे जाऊन दोन्ही समाजांसोबत बैठक घेणार आहे. मराठा-दलित अशी जातीय दंगल माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, दोन्ही समाजाच्या नागरिकांनी शांततेत घ्यावे. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद चांगला मिळाला असला तरी झालेल्या हिंसाचाराचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

वढू येथे गणपत गायकवाड यांच्या समाधीजवळ फ्लेक्स उभारण्यात आला होता. ज्यावरून वाद सुरु झाला त्या वादग्रस्त बोर्डवरील मजकुराची सत्यता इतिहास तज्ञांमार्फत तपासली जावी, अशी आग्रही भुमिका असून, वढू गावातील ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले अॅट्रोसीटीचे गुन्हे मागे घेण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन्ही समाजात सलोखा रहावा यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा प्रयत्न करेल, असेही कोंढरे यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या दोन मराठा युवकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये शासकीय मदत मिळावी अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. या दंगलीत या दोन युवकांना ठेचुन मारण्यात आले असून, त्यांच्या खुन्यांना कठोर शासन झाले पाहिजे. कोरेगाव भिमा आणि नगर रस्त्यावरील नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या सर्व समाजाच्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सर्वच दंगल खोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मराठा मोर्चाची मागणी आहे.

ग्रामस्थांनी पुर्वकल्पना देऊनही पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते. परंतू त्याबाबत पोलिस प्रशासनाकडून हलगर्जीपणा करण्यात आला असून, अशा पोलिस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. सोशल मीडियाव्दारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच मराठा समाज बांधवांनीही राज्यघटनेचा आदर ठेवून शांतता बाळगावी. आत्तापर्यंत मराठा समाजाच्या वतीने 58 मोर्चे शांततेमध्ये काढण्यात आलेले होते. परंतू कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही. मात्र आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये घडलेल्या काही घटनांचा निषेध करीत असून दोशींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही कुंजीर यांनी यावेळी केली.