Wed, Apr 24, 2019 16:37होमपेज › Pune › पुणे : सणसवाडी येथे गोळीबारात एक ठार 

पुणे : सणसवाडी येथे गोळीबारात एक ठार 

Published On: Jan 19 2018 4:36PM | Last Updated: Jan 19 2018 4:36PMसणसवाडी : वार्ताहर 

सणसवाडी ता. शिरूर येथे आज सकाळी गंगाराम बाबुराव दसरवाड (वय ३०)  या युवकावर दुचाकीवरून आलेल्‍या हेल्‍मेटधारक दोघा व्यक्‍तींनी गोळीबार केला. यात तो जागीच ठार झाला. यानंतर गोळीबार करणारे अज्ञात दोन व्यक्ती दुचाकीवरून पसार होण्यात यशस्‍वी झाले.

गंगाराम बाबुराव दसरवाड हा मुळचा शिकारा, मुखेड , जिल्हा नांदेड  येथील युवक सणसवाडी येथे गेल्‍या १० वर्षांपासून राहत आहे. तो कंपन्यांमध्ये दूध व कॅन्टीन साठी ठेकेदारा मार्फत चपाती पुरवण्याचे काम करत होता. गंगाराम हा आज सकाळी ११. ३० च्या सुमारास दुध घेवुन सणसवाडी फाट्यावरून  सणसवाडी गावाकडे स्कुटर वरून जात होता. तो सणसवाडी गावाजवळील दशक्रिया घाटाजवळ आल्यावर मोटारसायकल वरील  हेल्मेटधारक  दोन व्यक्‍तींनी गंगारामवर गोळ्या झाडल्‍या यात तो जागीच ठार झाला.गोळ्या घालणारे अज्ञात इसम हे सणसवाडी दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले.

मागून येणाऱ्या लोकांनी जखमी गंगारामला अॅम्बुलन्स मधून सणसवाडी येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्‍याचा मृत्‍यू झाला. यावेळी सणसवाडी येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, शिक्रापूर पी. आय . रमेश गलांडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली . यावेळी स्थळावर पंचनामा करत असताना एक रिकामी पुंगळी सापडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी  तातडीने तपास पथके रवाना केली आहेत.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा व सणसवाडी येथील प्रकरणानंतर वातावरण शांत होत नाही तोवर गोळीबार प्रकरणाने सणसवाडी परिसर हादरून गेला आहे. सणसवाडी बाबत शिक्रापूर पोलिसांची मोठी कसोटी लागली आहे. अशा अशांत प्रकरणाने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.