Fri, Feb 22, 2019 09:30होमपेज › Pune › साखर शंभर रुपयांनी उतरली

साखर शंभर रुपयांनी उतरली

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 10:33PM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

राज्यात ऊस गाळप हंगाम जोमाने सुरू झालेला आहे. शेतकर्‍यांना उसाची पहिली उचल रक्कम देण्यासाठी कारखान्यांकडून साखर विक्रीचे प्रमाण वाढले असून, निविदांचे भाव खाली आले आहेत. त्याचा परिणाम घाऊक बाजारपेठेवर होऊन मागणीअभावी साखरेचे भाव क्विंटलला पुन्हा शंभर रुपयांनी कमी झालेले आहेत. शनिवारी एस् 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा भाव 3450 ते 3500 रुपयांवर आला आहे.
सणसूद नसल्याने बाजारपेठेत सध्या मागणी कमीच आहे.

तसेच नियमित ग्राहकांकडूनही साखरेला उठाव कमीच असल्याचे सांगून पुणे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय गुजराथी म्हणाले की, साखरेच्या निविदा वस्तू आणि सेवाकरविरहित (जीएसटी) 3200 ते 3225 रुपयांपर्यंत खाली आलेल्या आहेत. त्यावर 5 टक्के जीएसटी  आणि वाहतूक भाड्याचा विचार करता हे भाव वाढतात. मात्र, त्या स्थितीतही साखरेला उठाव कमीच आहे. लग्नसराई असूनही साखरेला अपेक्षित मागणी नसल्याने भाव उतरत आहे. 

राज्यात चालू वर्षी साखरेचे उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे; तसेच देशपातळीवरही साखरेचे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशातून साखरेची खरेदी करण्याकडे अन्य राज्यांचा कल वाढत चालला आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रापेक्षा कमी भावात साखर उपलब्ध होत असून, वाहतुकीचा खर्चही कमी येत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून साखरेच्या भावात मागणीअभावी घसरण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.