Tue, May 21, 2019 00:38होमपेज › Pune › गड्या आपुले पुणेच खरे!

गड्या आपुले पुणेच खरे!

Published On: Aug 14 2018 1:39AM | Last Updated: Aug 14 2018 1:40AMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

आजवर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याबाबत ‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जात होते. मात्र, हे शहर आता ‘जगण्याचे माहेरघर’ ठरले आहे. केंद्रीय  गृहनिर्माण आणि शहर विकासमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी जाहीर केलेल्या सुलभ जीवनमान निर्देशांक (लिव्हेबिलिटी इंडेक्स) यादीत पुणे शहर  जगण्यासाठी भारतातील नंबर एकचे शहर ठरले आहे. या यादीत नवी मुंबई आणि बृहन्मुंबई अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर तर ठाणे सहाव्या  स्थानी आहे. 

इप्सॉस रिसर्च, अ‍ॅथेना इन्फोनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स मासिकाचे इंटेलिजेन्स युनिट (ईआययू) या संस्थांनी केंद्र सरकारासाठी देशातील 111 शहरांमध्ये  60 हजार नागरिकांची मते जाणून घेत हे संयुक्त सर्वेक्षण केले गेले. 50 हजार विविध मुद्द्यांवर शहरांनी कागदपत्रे सादर केली. सर्वेक्षनातील दुसर्‍या टप्प्यात  10 हजार कागदपत्रे चाळण्यात आली. 111 शहरांतील 14 हजार विविध युनिट्स, विभागांचे प्रत्यक्ष लेखापरीक्षण केले गेले. 

संस्था आणि प्रशासन, सामाजिक  पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक या 4 निकषांवर शहरांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यातही 15 प्रकारचे वर्गीकरण  आणि 78 सूचक होते. सर्वच 78 सूचकांना 100 गुण होते. 

संस्थात्मक आणि सामाजिक निकषांसाठी प्रत्येकी 25-25 गुण ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे,  भौतिक परिस्थितींसाठी 45 आणि आर्थिक निकषांसाठी 5 गुण ठेवण्यात आले होते. त्यानुसार, जगण्यासाठी उत्तम पहिल्या दहा शहरांच्या यादीत चौथ्या  स्थानी तिरूपती, पाचव्या क्रमांकावर चंदीगड, सातव्या स्थानी रायपूर, इंदूर आठव्या, विजयवाडा नवव्या तर भोपाळ दहाव्या स्थानी आहे. मध्य प्रदेशची  राजधानी भोपाळ आणि छत्तीसगडची राजधानी रायपुर आहे. चेन्नई 14 व्या तर देशाची राजधानी नवी दिल्ली 45 व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम  बंगाल, तमिळनाडूमधील एकाही शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळालेले नाही. उत्तर प्रदेशमधील रामपूर या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर  आहे. 

स्वच्छ शहरांमध्येही राज्याची बाजी 

स्वच्छ शहरांच्या यादीतही राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि वसई-विरार या शहरांनी  स्थान पटकावले आहे.  

111 शहरांमध्ये सर्वेक्षण; 60 हजार नागरिक सहभागी

सुरूवातीला देशातील सर्व 100 स्मार्ट शहरे तसेच 10 लाखांहून अधिक लोकसंखेच्या एकूण 116 शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार होते. मात्र,  हावडा, कोलकाता आणि दुर्गापूरने या सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला होता. नवीन रायपूर आणि अमरावती (आंध्र प्रदेश) ही शहरे सर्वेक्षणाच्या निकषात  बसू शकली नाहीत.