Thu, Jul 18, 2019 14:34होमपेज › Pune › प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी मधप्रशिक्षण केंद्राला ग्रहण

प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी मधप्रशिक्षण केंद्राला ग्रहण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : शंकर कवडे

 राज्यातील नैसर्गिक झाडेझुडपे व शेतीपिके यातून मिळत राहणार्‍या फुलोर्‍यातून मधमाश्यांमार्फत मिळणार्‍या मधाचा आधुनिक शास्त्रीय पद्धतींचा वापर करून मध काढला जावा, या उद्देशाने सुरू केलेल्या केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण केंद्राला अपुर्‍या प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी ग्रहण लागले आहे. आठ वर्षांपासून रिक्त असलेल्या जागांवर केंद्रामध्ये प्रशिक्षित तज्ञांची नेमणूक न केल्याने या क्षेत्रात क्रांती घडवून उद्योजक होण्याची स्वप्ने घेऊन येणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.  

मधमाशापालनाच्या जनजागृतीसह राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने 1962 साली शिवाजीनगर येथे केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्याअंतर्गत 5 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंत विविध विषयांवर आधारित 13 कोर्सेस सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून काही विषयांशी संबंधित तज्ज्ञ प्रशिक्षक नसल्याने उपलब्ध असलेल्या प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागत आहे. सध्या केंद्रात 8 प्रशिक्षक असून, त्यांपैकी 3 प्रशिक्षक येत्या 3 ते 4 महिन्यात निवृत्त होतील. परिणामी, यापूर्वीच तज्ञांची कमतरता असलेल्या केंद्राच्या समस्येत आणखी भर पडणार आहे.  केंद्रातील विविध कोर्सेससाठी दरवर्षी 1 हजाराहून अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात.

यामध्ये गेल्या काही वर्षांत शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, वर्ग चालविण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने अनेकांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करणे भाग पडत आहे. सध्या प्रशिक्षण केंद्रात मधमाशांची शरीरचना, त्यावरील रोगनिदान व त्यावरील उपायांच्या माहितीसाठी किटकशास्त्रज्ञ, मधाचे नमुने तपासणे, त्यांचे वर्गीकरण तसेच विश्‍लेषणासंबंधीचे रसायनशास्त्रतज्ञ तसेच पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने परागीभवनाची माहिती असणारे वनस्पतीशास्त्र तज्ञांची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन भरती झाली नसल्याने प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन होत नाही. 

मध क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व विस्तार होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, प्रशिक्षित तज्ज्ञ नसल्यामुळे मधक्षेत्रातील संशोधन रखडले आहे. एकीकडे मधक्रांतीची स्वप्ने पाहणार्‍या केंद्र शासनाला येथील प्रशिक्षण केंद्रात तज्ञांची नेमणूक करण्यासंबंधी वेळ नसल्याने विद्यार्थी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षण केंद्रात तज्ञांची नेमणूक करण्यासंदर्भात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मुंबई येथील पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. याबाबत केंद्राचे उपनिदेशक डॉ. आर. के. सिंह यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ  शकला नाही.