होमपेज › Pune › पुण्याची मुलगी काश्मीरमध्ये करू शकते आत्मघाती हल्ला

पुण्याची मुलगी काश्मीरमध्ये करू शकते आत्मघाती हल्ला

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 1:47AMपुणे : प्रतिनिधी

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘इसिस’च्या संपर्कात असलेल्या पुण्यातील तरुणीचे मतपरिवर्तन केल्यानंतर ती आता पुन्हा सक्रिय झाली असून सध्या काश्मीरमध्ये आहे़  तिच्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने पुणे पोलिसांना दिला आहे. मात्र ही तरुणी सध्या शिक्षणासाठी बाहेरगावी असून ती कोठेही गेली नसल्याचे तिच्या आईने सांगितले, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

उच्चभ्रू कुटुंबातील ही तरुणी बंडगार्डन रोडवरील एका शाळेत 11 वीत शिकत  असताना ‘इसिस’ शी संपर्कात होती़  2015 मध्ये तिच्या आई-वडिलांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी एटीएसशी संपर्क केला. दरम्यान, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले की, गुप्तचर विभागाकडून काल आम्हाला याची माहिती मिळाली़  आम्ही तिच्या घरी जाऊन चौकशी केली़  त्यावेळी ती सध्या शिक्षणासाठी बाहेरगावी असून आमचे नातेवाईक तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. ती सध्या कोठे आहे हे सांगू शकत नाही, असे तिच्या आईने सांगितले. पोलिसांना तिचा ठावठिकाणा माहिती नाही.