Tue, May 21, 2019 04:54होमपेज › Pune › पुणे जिल्हा आता होणार केरोसीनमुक्त

पुणे जिल्हा आता होणार केरोसीनमुक्त

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 1:44AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर राज्यातील पहिल्या केरोसीनमुक्त महापालिका ठरल्या आहेत. त्याच धर्तीवर आता पुणे जिल्हाही केरोसीनमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व 1 हजार 696 रेशन दुकाने पॉस मशिन्सशी जोडली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सार्वजनिक धान्य वितरणामध्ये पारदर्शकता आणून त्याचा काळ बाजार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला पुरवठा विभागाने संपूर्णपणे केरोसीनमुक्त शहर बनवले आहे. त्याचा धर्तीवर जिल्हा प्रशासानाने पुणे जिल्ह्यालाही केरोसीनमुक्त करण्याचा संकल्प सोडला आहे. जिल्ह्यात ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस आहे त्यांना केरोसीन देता येत नाही, अशा लाभार्थ्यांची शोधमोहीम घेण्यात आली. त्यात गॅस असतानाही केरोसीन घेणार्‍यांची नावे यादीतून कमी केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी केरोसीनची मागणी कमी झाली आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये 1320 के.एल.ची मागणी होती ती डिसेंबर 2017 ला 804 के.एल. म्हणजेच 39.9 टक्के कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

जिल्ह्यात 1 हजार 696 रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशिन्स कार्यान्वित करण्यात आली असून, ती सध्या पूर्णपणे सुरू आहेत. जिल्ह्यासाठी 14 हजार 327 मे. टन धान्यापैकी 9 हजार 832 मे. टन धान्य पॉस मशिन्सनेे वाटप करण्यात आले आहे.