Mon, Nov 19, 2018 00:13होमपेज › Pune › पुणे : विहिरीत बुडून २ लहान मुलांचा मृत्यू

पुणे : विहिरीत बुडून २ लहान मुलांचा मृत्यू

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 1:15AMखोडद ः वार्ताहर

जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथील आतकरी मळ्यात दोन लहान मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी निदर्शनास आली. या मुलांना अज्ञाताने विहिरीत टाकल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेत मुलगी अरू दशरथ आतकरी (5) आणि  मुलगा साहिल दशरथ आतकरी (4) अशी या लहनग्यांची नावे आहेत. घटनेबाबत समजताच परिसरातील नागरिकांनी या विहिरिकडे धाव घेतली.

याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्याला कळविण्यात आले. त्यानंतर या विभागाचे ठाणे अंमलदार आबा चांदगुडे व साबळे यांच्या टीमने रात्री 9 वाजता घटनास्थळी धाव घेऊन या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरू आणि साहिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी होते. त्यांचे वडील दशरथ गणपत आतकरी हे पाणी देण्यासाठी शेतावर गेले होते, तर आई चांगुणा या जनावरांना चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यानच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. 

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.