होमपेज › Pune › पुण्यात पहाटेचा गारठा कायम

पुण्यात पहाटेचा गारठा कायम

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 12:06AM
पुणे: प्रतिनिधी      

 पुणे शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचे पुनरागमन झाले असून रविवारी देखील पहाटेचा गारठा कायम होता. रविवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. त्यातच उत्तरेकडून शहराच्या दिशेने येणार्‍या अतिथंड व कोरड्या वार्‍यांच्या प्रभावामुळे पहाटे व रात्री हुडहुडी भरवणारी थंडी पडली होती. शनिवारच्या 13.5 अंशांवरून रविवारी 13.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शहर व परिसरात गेले 4-5 दिवस ढगाळ वातावरण होते.

यामुळे आर्द्रतेत प्रचंड वाढ होत पुणेकरांना उन्हाळ्याची चाहूल लागली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पहाटेची बोचरी थंडी नागरिकांना सुखावून जात आहे. दरम्यान, पुढील 2-3 दिवस शहर व परिसरात पहाटेचा गारठा कायम राहणार असून किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या घरात राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.