Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Pune › वर्धापन दिनाचा शहर सेनेला विसर

वर्धापन दिनाचा शहर सेनेला विसर

Published On: Jun 21 2018 1:23AM | Last Updated: Jun 21 2018 12:19AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडला आहे. कारण सेनेच्या स्थापना दिनानिमित्त संपूर्ण शहरात पक्षाच्या वतीने एकही कार्यक्रम झाला  नाही. एरवी पत्रकबाजी करणार्‍या पदाधिकार्‍यांना सेनेच्या वर्धापन दिनाचा विसर पडल्याने त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेचे भाजपशी संबंध ताणले गेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 2019 हे वर्ष शिवसैनिकांसाठी महत्वाचे वर्ष असेल असे त्यांनी म्हटले आहे; परंतु शहर शिवसेनेला त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये श्रीरंग बारणे (मावळ) आणि शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर) असे शिवसेनेचे दोन खासदार जनतेने निवडून दिले आहेत. तसेच, पिंपरी विधानसभा मतदार संघातून अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार आमदार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्षाचे  राहुल कलाटे, रेखा दर्शीले, अश्विनी वाघमारे, अश्विनी चिंचवडे, निलेश बारणे, सचिन भोसले, अमित गावडे, प्रमोद कुटे, मीनल यादव असे 9 नगरसेवक निवडून आले आहेत.

शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. कार्यकारिणीची घोषणाही झाली आहे. शहराच्या राजकारणात दोन खासदार, एक आमदार आणि 9 नगरसेवक तसेच शहरप्रमुख व शहर कार्यकारिणी अशी ताकद असलेल्या शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त एकही जाहीर कार्यक्रम अथवा एकही सामाजिक उपक्रम झाला नाही. शिवसेनेत आलेल्या या मरगळीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.