Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Pune › उपोषण काँग्रेसविरोधात आणि टीका राष्ट्रवादीवर

उपोषण काँग्रेसविरोधात आणि टीका राष्ट्रवादीवर

Published On: Apr 12 2018 4:02PM | Last Updated: Apr 12 2018 4:02PMपुणे : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचा आणि विरोधी खासदारांचा निषेध करण्यासाठी शहर भाजपने आयोजित केलेल्या एकदिवसीय आंदोलनात वक्त्यांनी भाषण करताना राष्ट्रवादी कॉग्रेसवर टीका केली. उपोषण काँग्रेसविरोधात आणि लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेच काहीसे चित्र या आंदोलनात पहायला मिळाले. बहुतेक वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचाच जप केला. यानिमित्ताने पक्षाचे सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. 

नुकत्यात झालेल्या केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही, असा आरोप करत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर एकदिवसीय उपोषण केले जात आहे. त्यानुसार शहराचे खासदार अनिल शोरोळे आणि भाजप शहराध्यक्ष योगेश गोलावले यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपकडून पुण्यातही जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर एकदिवसीय उपोषण केले जात आहे. या उपोषणास राज्यसभा खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 

काँग्रेसने पंधरा वर्षात देशाची वाट लावल्यामुळेच देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान केले आहे. जनतेने सनसनीत चपराक लावूनही विरोधक सुधरायचे नाव घेत नाहीत. स्वत: जनताभिमुख काम केले नाही, आम्ही जनताभिमुख काम करत आहोत, मात्र विरोधक सभागृहात गोंधळ घालून विकासरथ आडविण्याचा प्रयत्न करत आहेत. 

राष्ट्रवादी कॉग्रेसने सुरू केलेले हल्लाबोल आंदोलन शासनाच्या निषेधार्थ नाही तर, निराशेच्या मनस्थितीतून सुरू केले आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपला सत्ता मिळणार आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यांना सध्या काहीच काम राहिलेले नाही, म्हणून हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला जनतेचा पाठींबा नाही. ते पैसे देऊन आंदोलनासाठी लोकांना गोळा करत आहेत. सत्ता गेल्यामुळे जातीय दंगली भडकविण्याचे काम राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस करत आहेत. विरोधकांना ज्या योजना आजवर सुचल्याही नाहीत, त्या आम्ही योजना जनतेसाठी आणल्या आहेत. पुणे शहरात आम्ही विविध प्रकल्प राबवत आहोत. वर्षभरातच आम्ही शहराचा कायापालट केला आहे. भविष्यातही सत्ता येणार नाही, हे माहिती झाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे, अशा भावना वक्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

राज्यसभा खासदारांचे शक्तीप्रदर्शन : 

राज्यसभा खासदार संजय काकडे हे उपोषण स्थळी आल्यानंतर त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली होती. खासदार काकडे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उपोषण स्थळावरून उठून आपल्या कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी त्यांच्या गटाचे बहुसंख्य नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यामागे निधून गेले. शंभर ते दीडशे कार्यकर्ते काकडे यांच्यामागे निघून गेल्याने उपषण स्थळ क्षणात मोकळे झाले. त्यामुळे जे कार्यकर्ते रस्त्यावर उभे होते, त्यांना मांडवात येऊन बसण्याची विनंती करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली. एकूण या उपोषणाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची संधी अप्रत्यक्षपणे  खासदारांनी साधली.