Fri, Jul 19, 2019 22:02होमपेज › Pune › भिकारीमुक्‍त पुणे होणार कधी?

भिकारीमुक्‍त पुणे होणार कधी?

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 05 2018 12:12AMपुणे : प्रतिनिधी

शहर आणि उपनगर हे भिकारीमुक्‍त करण्याची नितांत गरज असून, ‘भिकारी रॅकेट माफियां’च्या तावडीतून भिकार्‍यांची सुटका करणे गरजेचे आहे. राज्याच्या धर्मादाय आयुक्‍तांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्यासह राज्य भिकारीमुक्‍त करण्याचा संकल्प केला होता. पण, सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त तो पुढे ढकलला असून, हा सोहळा उरकल्यानंतर भिकारीमुक्‍त पुणे करण्याचा मानस या विभागाने व्यक्‍त केला आहे. पण, ही मोहीम लवकर सुरू करावी, अशी मागणी आता होत आहे. 

दैनिक ‘पुढारी’ने दि. 4 मेच्या अंकात शहर आणि उपनगरात ‘माफियां’द्वारे भिकार्‍यांचे रॅकेट कसे चालते हे उघडकीस आणले. त्यांना माफियांकडून दरदिवशी हजारांचे ‘टार्गेट’ दिले जाते व ते पूर्ण न केल्यास कसे त्यांना बेदम मारहाण केली जाते हे यातून समोर आले. यामध्ये आणखी धक्‍कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या लुळ्या पांगळ्या भिकार्‍यांना औरंगाबाद, नागपूर, पंढरपूर, नवी मुंबई येथूनच नव्हे तर युपी, बिहार या राज्यातूनही  तेथील माफियांना 15 हजार देऊन खरेदी केले आहे. पुण्यात असे जवळपास दीडशे ते 200 भिकारी असून, त्यांना वर्दळीच्या चौकात भीक मागायला लावले जाते.

याचाच अर्थ दया-माया करून जे काही पुणेकर त्या भिकार्‍यांना देतात ते त्यांच्या पदरात नव्हे तर त्यातून ‘माफियां’च्या तुंबड्या भरल्या जात आहेत. कारण त्यांना हे माफिया केवळ अंगात जीव राहण्यापुरते खाण्यास देऊन त्यांचा वापर पैसे कमविण्यासाठी करून घेत असल्याचे यातून उघड झाले आहे. प्रत्येकी हजार पकडले तर दरदिवशी 200 भिकार्‍यांद्वारे दोन लाख, तर महिन्याकाठी 60 लाखांची उलाढाल होत असून, ती थेट माफियांच्या घशात जात आहे. 

भिकार्‍यांची पिळवणूक होऊ नये म्हणून राज्याचे धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी राज्यात ‘भिकारी पुनर्वसन’ मोहीम राबविण्याचे घोषित केले होते. त्यासाठी त्यांनी सामाजिक संस्था, देवस्थान, वाहतूक पोलिस यांची मदत घेण्यासाठीही बोलणे केले होते. त्यासाठी अनेक संस्थाही तयार झाल्या होत्या. मुंबईतल्या एका संस्थेने कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारीही दर्शवली होती. या मोहिमेद्वारे भीक मागण्यापासून परावृत्त करणे, शक्य आहे त्यांना काम देणे, वृद्ध भिकार्‍यांना वृद्धाश्रमात पाठविणे व जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर आणि माफियांवर पोलिसांद्वारे गुन्हे दाखल करून त्यांना भिकारी पुनर्वसन केंद्रात भरती करणे, अशी ही योजना होती.